Instagram account hacked?: अलीकडे हॅकिंगच्या प्रकारामध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपच्या ५० कोटी युजर्सचा डेटा डार्कवेबवर विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचे समोर आले होते. यामध्ये युजरचा इमेल आणि मोबाइल क्रमांकाचा समावेश असल्याचे समजले होते. त्यानंतर ट्विटरमध्येही असाच प्रकार घडल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर युजरने आपला खाजगी डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
युजरचे खाते सुरक्षित करण्यासाठी इन्स्टाग्रामने पावले उचलली आहेत. हॅक झालेले खाते परत मिळवण्यासाठी इन्स्टाग्रामने नवीन फीचर सादर केले आहे. Instagram.com/hacked हे मोबाईल किंवा डेस्कटॉपच्या ब्राऊजरवर सर्च करून तुम्ही तुमचे खाचे परत मिळवू शकता.
(Whatsapp call : व्हॉट्सअॅपवर Call Recording करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स)
हॅक झालेले खाते परत मिळवण्यासाठी लाँच केलेल्या फीचरसह, युजरची ओळख मित्रांद्वारे पटवून खाते परत मिळवण्याची सोय देखील उपलब्ध करण्यात आल्याचे इन्स्टाग्रामने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे.
अशी खाती ज्यांना उघडताना अडचणी येत आहेत किंवा कदाचित ती हॅक झालेली असेल, त्यांच्यासाठी आम्ही Instagram.com/hacked तयार केले आहे. खात्यासंबंधी समस्या सोडवण्याबाबत किंवा तक्रार करण्याबाबत या संकेतस्थळावर युजर अवलंबून राहू शकतात. तुम्हाला तुमच्या खात्यात प्रवेश करता येत नसल्यास, तुमच्या मोबाईल फोन किंवा डेस्कटॉप ब्राऊजरवर Instagram.com/hacked असे टाका, असे ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे.
हॅक झालेले खाते असे मिळवा परत
- इन्स्टाग्राम खाते वापरता येत नसल्यास, मोबाईल किंवा डेस्कटॉपच्या ब्राऊजरवर Instagram.com/hacked असे एन्टर करा.
- निवडण्यासाठी तुम्हाला काही पर्याय दिले जातील. खाते हॅक झाले, पासवर्ड हरवले, खाते डिसेबल केले आणि इतर पर्याय दिले जातील. यातील तुमची समस्या निवडल्यानंतर खाते परत मिळवण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स पूर्ण कराव्या लागतील.
वर दिलेल्या उपायाव्यतिरिक्त आणखी एका उपायाद्वारे तुम्ही खाते परत मिळवू शकता. तुमची ओळख पटवून खाते परत मिळवण्यासाठी तुम्ही इन्स्टाग्रामवरील दोन मित्रांची निवड करू शकता. मित्र निवडल्यानंतर इन्स्टाग्राम त्यांना रिक्वेस्ट पाठवेल. दोन्ही मित्रांनी २४ तासांच्या आत पुष्टी केल्यास तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करावा लागेल. त्यांनी इन्स्टाग्राम रिक्वेस्टला प्रतिक्रिया न दिल्यास तुम्हाला इतर दोन मित्र निवडावे लागतील.