Instagram Launch Reels As Separate App : अनेकांचा अर्धाअधिक वेळ आता इन्स्टाग्रामचे रील्स पाहण्यात जातो. सकाळी ऑफिस, कॉलेजला पोहोचेपर्यंत आणि रात्री झोप लागेपर्यंत आपण रील्स स्क्रोल करीत असतो. आपल्या जीवनात जशा गोष्टी घडत असतात, तसेच हुबेहूब कन्टेन्ट काही क्रिएटर्स अगदी आकर्षक पद्धतीने बनवत असतात. त्यामुळे इन्स्टाग्राम रील्स (Reels) बघण्याचा मोह काही केल्या कमी होत नाही. तसेच तुम्हाला लक्षात असेल की, इन्स्टाग्रामवर रील्सचे फीचर येण्यापूर्वी टिकटॉक हे ॲप प्रचंड लोकप्रिय होते. तर आता या ॲपला टक्कर देण्यासाठी इन्स्टाग्राम काहीतरी नवीन घेऊन येणार आहे.

व्हिडीओ स्क्रोलिंग अनुभव आणखीन खास करणार…

इन्स्टाग्राम त्याच्या शॉर्ट-फॉर्म व्हिडीओ म्हणजेच ‘रील’ (Reels) फीचर्ससाठी एक स्वतंत्र, वेगळे ॲप लाँच करण्याचा विचार करीत आहे, असे इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी या आठवड्यात कर्मचाऱ्यांना सांगितले. मेटा-मालकीची ही कंपनी युनायटेड स्टेट्समधील टिकटॉकच्या सध्याच्या स्थितीचा फायदा घेण्याचा विचार करीत आहे आणि व्हिडीओ स्क्रोलिंग अनुभव आणखीन खास करणार आहे.

जानेवारीमध्ये मेटाने एक नवीन व्हिडीओ एडिटिंग ॲपचीही घोषणा केली होती, ज्याचा उद्देश CapCut च्या युजर्स बेसचा एक हिस्सा मिळविण्याच्या उद्देशाने दिसत आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे TikTok ची कंपनी बाइट डान्सचे कॅपकट हे व्हिडीओ एडिटिंग अ‍ॅप आहे. त्याचप्रमाणे Instagram देखील व्हिडीओ एडिटिंग अ‍ॅपसह येऊ शकते.

Meta ने यापूर्वी TikTok ला आव्हान देण्यासाठी मेटाने २०१८ मध्ये Lasso नावाचे एक शॉर्ट-व्हिडीओ ॲप लाँच केले होते; पण, ते युजर्सच्या पसंतीस न उतरल्याने ते लवकरच बंद करण्यात आले. मेटाने या निर्णयाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसली तरी, रीलला (Reels) TikTok चा मजबूत स्पर्धक बनवण्याच्या दृष्टीने ते एक धोरणात्मक पाऊल मानले जात आहे.

Story img Loader