इन्स्टाग्राम हे मेटा कंपनीच्या मालकीचे सोशल मीडियावरील प्रसिद्ध अॅप आहे. मेटा कंपनी हे त्यांच्या युजर्ससाठी नवनवीन अपडेट आणि फीचर्स लाँच करीत असतात. तर इन्स्टाग्राम वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर घेऊन येणार आहे. इन्स्टाग्रामने गेल्या वर्षी ‘क्लोज फ्रेंड्स’ (Close Friends) हे फीचर युजर्ससाठी लॉंच केले होते. या फीचरच्या मदतीने पोस्ट, रील्स, स्टोरीज आणि नोट्स फक्त जवळच्या मित्रांपर्यंत युजर्स शेअर करू शकतात. तर आता, मेटाच्या मालकीचे फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम ॲप अधिक खासगी करण्यासाठी ‘फ्लिपसाइड’ नावाचे एक नवीन फीचर आणणार आहे. इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी म्हणाले की, सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. हे फीचर वापरकर्त्यांना गुप्त (प्रायव्हेट) फोटो शेअर करण्याची परवानगी देईल. तुमच्या प्रोफाइल इतर वापरकर्त्यांना पर्यायी खाते म्हणून दाखवेल आणि तुम्हाला फॉलोअर्स व मित्रांच्या निवडक गटासह अधिक प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्याची अनुमती देईल.
इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी सांगितले की, कंपनी ‘फ्लिपसाइड’ नावाच्या फीचरची चाचणी करीत आहे. हे फीचर इन्स्टाग्रामवर लॉँच करू याची आम्हाला खात्री नाही. पण, एकीकडे इन्स्टाग्राम अधिक प्रायव्हेट जागा तयार करणे चांगले वाटते. दुसरीकडे दुहेरी अकाउंट आणि जवळच्या मित्रांचा लहान प्रेक्षकवर्ग एकत्र ठेवण्यासाठी हा एक अनोखा मार्ग ठरेल. आम्ही चाचणी करून झाल्यावर लोक कसा प्रतिसाद देतात ते पाहू आणि पुढे हे फीचर लाँच करू, असे त्यांनी पोस्टमध्ये सांगितले आहे.
फ्लिपसाइड फीचर कसे असेल ?
फ्लिपसाइड फीचर तुमच्या क्लोज फ्रेंड्स मित्रांसाठी एक नवीन जागा उपलब्ध करील. इन्स्टाग्राम अकाऊंटच्या खाली एक प्रायव्हेट जागा तयार करण्यास अनुमती देईल. जिथे ते त्यांच्या फक्त निवडक मित्रांबरोबर अधिक वैयक्तिक चित्रे आणि व्हिडीओ पोस्ट करू शकतील आणि निवडक युजर्स तुमच्या प्रोफाइलची ही बाजू पाहू शकणार आहेत. फॉलोअर्स बटणावर टॅप करून किंवा त्यांच्या मुख्य प्रोफाइलवर खाली स्वाइप करून वापरकर्त्याच्या ‘फ्लिपसाइड’ खात्यात युजर्स प्रवेश करू शकणार आहेत. हे फीचर्स चाचणीनंतर काही निवडक वापरकर्त्यांसाठी आणले जाईल.