मेटा प्लॅटफॉर्म्स इन्कॉर्पोरेशनच्या इन्स्टाग्रामने आता दोन अब्ज सक्रिय वापरकर्त्यांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला असून ही वाटचाल अशीच सुरू राहिली तर फेसबुकच्या वापरकर्त्यांची संख्यादेखील इन्स्टाग्राम सहज पार होईल, असे चित्र आहे. गेल्या काही वर्षांत फेसबुकच्या वापरकर्त्यांची संख्या घटली असून सक्रिय वापरकर्तेही फारसे वाढलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर इन्स्टाग्रामची वाटचाल लक्षणीय ठरते आहे. फेसबुकच्या वापरकर्त्यांची संख्या सध्या २.९६ अब्ज एवढी आहे.
आणखी वाचा : APPLE सावध राहा, सायबरहल्ल्याची शक्यता… अॅपलच्या iOs आणि iPadOS वापरकर्त्यांना ‘सीइआरटी’चा इशारा
कंपनीचा महसूल कमी झाल्याची माहिती देणारा अहवाल बुधवारी बाहेर आल्यानंतर कंपनीचा बाजारपेठेतील शेअरही गडगडला. याच अहवालातील माहितीनुसार कंपनीचे दुसरे अॅप व्हॉटस् अपच्या सक्रिय वापरकर्त्यांची संख्याही दोन अब्ज आहे. तर मेटाच्या सर्व सोशल अॅप्सच्या वापरकर्त्यांची महिन्याभरातील संख्या ३. ७१ अब्ज एवढी आहे.
आणखी वाचा : APPLE WATCH नवऱ्याने जिवंत गाडले, अॅपल वॉचने मात्र सुटका केली
२०१८ सालच्या जून महिन्यात इन्स्टाग्रामने एक अब्ज वापरकर्त्यांचा टप्पा पार केला. तत्कालीन फेसबुकने इन्स्टाग्राम विकत घेतल्यानंतर या अॅपमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले. पूर्वी केवळ फॉलो करणाऱ्या वापरकर्त्यांच्याच पोस्ट पाहायला मिळायच्या. मात्र नंतर इन्स्टाने वापरकर्त्यांच्या आवडीनुसार अल्गोरिदम वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे आवडीनिवडीनुसार पोस्ट दिसण्यास सुरुवात झाली आणि वापरकर्त्यांची संख्या वाढली.
आणखी वाचा : हिवाळ्यात ऊब तर उकाड्यात गारवा देणारे कापड कुणी केलेय तयार?
याशिवाय टिकटॉक या प्रतिस्पर्धी अॅपप्रमाणे व्हिडिओ रील्स देण्यास इन्स्टाग्रामने सुरुवात केली. त्यानंतर वापरकर्त्यांची संख्या सातत्याने वाढत गेली. सोशल मीडिया उद्योगातील ट्रेण्डनुसार सातत्याने बदल करण्याचे धोरण इन्स्टाग्रामने अवलंबले. टिकटॉकनेही फॉलोअर्सनुसार नव्हे तर आवडीनिवडीच्या अल्गोरिदमचा वापर सुरू केला होता.
आणखी वाचा :पीएफ खात्याचा पासवर्ड विसरलात? काळजी करू नका! पासवर्ड रिसेट करण्यासाठी जाणून घ्या ‘या’ सोप्या टिप्स…
इन्स्टाग्राम, फेसबुकादी सोशल मीडिया अॅपवर वापरकर्त्यांनी सातत्याने येणे ही मेटाची गरज आहे, कारण सक्रिय वापरकर्त्यांच्या संख्येवर त्यांचा महसूल अवलंबून आहे. त्यातच जगभरामध्ये डिजिटल माध्यमांवरील जाहिरात खर्चामध्ये अनेक कंपन्यांनी कपात केल्याने उपलब्ध कमी आर्थिक स्रोतांसाठी सोशल मीडिया कंपन्यांना झगडावे लागत आहे. २०१२ साली फेसबुकने इन्स्टाग्राम विकत घेतले. सध्या मेटा या प्लटफॉर्म कंपनीमध्ये त्याचा समावेश होतो. २०१४ कंपनीने व्हॉटस् अपही विकत घेतले. मात्र त्याचे महसुल चक्र अद्याप बाल्यावस्थेतच आहे.