Apple iPhone In India: आयफोन प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती समोर येत आहे. भारतातील विविध व्यवसायात अग्रेसर असणारी टाटा कंपनी आता आयफोनसह करार करून भारतात प्रकल्प उभारणीच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भारतात आयफोनची निर्मिती करण्यासाठी तैवानच्या विस्ट्रॉन कंपनीशी टाटा समूह बोलणी करत आहे. आयफोन निर्माती अॅपल कंपनी आपल्या भारतीय उत्पादन युनिटचा विस्तार करू पाहत असताना.ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अॅपलला पुरवठा करणारी विस्ट्रॉन, टाटा समूहासोबत देशात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचा संयुक्त युनिट उभारण्याच्या चर्चेत असल्याचे समजत आहे.
टाटा समूह आयफोनचे विकास, पुरवठा साखळी आणि निर्मितीमध्ये विस्ट्रॉनचे सहाय्य घेण्याचा विचार करत आहे. जर हा करार झाला तर टाटा आयफोन बनवणारी पहिली भारतीय कंपनी ठरेल. सध्या, चीन आणि भारतातील विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन सारख्या उद्योगातील दिग्गजांकडून अॅपलचे आयफोन तयार केले जातात. या करारामुळे भारतातील विस्ट्रॉनच्या आयफोन निर्मिती क्षमता त्यांच्या सध्याच्या उत्पादनात पाच पटीने वाढू शकते.
Apple iphone : ‘या’ देशात आयफोन विक्रीवर बंदी; कारण जाणून तुम्ही व्हाल हैराण
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, टाटा विस्ट्रॉनच्या भारतीय ऑपरेशन्समध्ये काही भाग घेऊ शकतात. तर या दोन्ही कंपन्या मिळून एक नवीन उत्पादन प्रकल्प तयार करू शकतात. टाटा स्मार्टफोनच्या पलीकडे विस्ट्रॉनच्या उत्पादन व्यवसायाचा सुद्धा हिस्सा मिळवू शकेल. दक्षिण भारतात आयफोन चेसिस घटक तयार करत असल्याने टाटाने स्मार्टफोन पुरवठा साखळीत आधीच प्रवेश केला आहे.
टाटाच्या विस्ट्रॉनसोबतच्या करारामुळे इतर जागतिक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सना त्यांची उपकरणे निर्मिती व पुरवठ्यासाठी भारताचा विचार करण्यास आणि चीनवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्यास प्रोत्साहन मिळू शकते.