iPhone USB-C Port Vulnerability Exposed : गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी ओळखली जाणारी ॲपल कंपनी सध्या चर्चेत आहे. कारण एका संशोधकाने आयफोनच्या यूएसबी-सी कंट्रोलरची सुरक्षा यशस्वीरित्या भेदली आहे. त्यामुळे इथून पुढे आयफोन हॅक होण्याची शक्यता वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या अनेक वर्षांपासून ॲपल हॅकर्सचे लक्ष्य आहे. परंतु, आतापर्यंत हॅकर्सना आयफोनची सुरक्षा भेदता आली नव्हती. आता सुरक्षा संशोधकाने यूएसबी-सी कंट्रोलर हॅक केल्याचा दावा केल्यानंतर आयफोन वापरणाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर ॲपल कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

आयफोन १५ द्वारे ॲपलने यूएसबी-सी पोर्टचा वापर सुरू केला होता. या बदलासोबतच, त्यांनी एक नवीन यूएसबी-सी कंट्रोलर, ACE3 सादर केला होता. हा शक्तिशाली कस्टम चिपसेट पॉवर डिलिव्हरीचे व्यवस्थापन करण्यासह इतर बऱ्याच गोष्टी करतो.

थॉमस रोथ यांनी भेदली आयफोनची सुरक्षा

दरम्यान, सुरक्षा संशोधक थॉमस रोथ यांनी या चिपमधील एक बग शोधून काढला आहे. रोथ यांना असे आढळून आले की, रिव्हर्स इंजिनिअरिंग, आरएफ साइड-चॅनेल ॲनालायसिस आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फॉल्ट इंजेक्शनचा वापर करून ACE3 चिपची सुरक्षा भेदली जाऊ शकते. यातून हॅकर्स सर्व सुरक्षा भेदून डिव्हाइसवर नियंत्रण मिळवू शकतात.

थॉमस रोथ हे कंट्रोलर पुन्हा प्रोग्राम करण्यात, कोड इंजेक्ट करण्यात आणि सर्व सुरक्षा भेदण्यात यशस्वी झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, जर हॅकर्स आयफोनमधील या त्रुटीचा फायदा घेण्यास यशस्वी झाले तर ते आयफोनमध्ये आणि संभाव्यतः डेटामध्ये प्रवेश मिळवू शकतात, जी अर्थातच चिंताजनक बाब आहे. असे असले तरी, जोपर्यंत हॅकर तुमच्या फोनला यूएसबी-सी केबल कनेक्ट करणार नाही तोपर्यंत त्याला फोन हॅक करता येणार नाही.

आयफोन युजर्सनी काय काळजी घ्यावी?

या त्रुटीमुळे होणाऱ्या सांभाव्य धोक्यापासून वाचण्यासाठी आयफोन युजर्सनी सार्वजनिक ठिकाणच्या सी-टाईप चार्जर्सचा वापर टाळावा. आपत्कालीन परिस्थितीत तुमचा स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी नेहमी पॉवर बँक सोबत ठेवा. तसेच, कधीही अनोळखी डिव्हायसेसवर डेटा ट्रान्सफर करू नका. या गोष्टी पाळल्या तर आयफोन युजर्स यूएसबी-सी पोर्टद्वारे होणाऱ्या सायबर हल्लापासून वाचू शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iphones can be hacked through the usb c port iphone 15 iphone 16 aam