सध्या बऱ्याचदा असे होते की, तुम्ही एखाद्या वस्तूविषयी कुणाशीतरी समोरासमोर बोलत असता, तेव्हा त्या गोष्टीबद्दल तुम्ही काहीही सर्च न करतासुद्धा अचानक त्याची जाहिरात तुमच्या फोनवर येते. तेव्हा, ‘माझा फोन माझे बोलणे ऐकतोय की काय?’ असा प्रश्न मनात उभा राहतो. तुमच्यासोबतही कधी असं झालंय का? जर उत्तर हो असेल, तर हे एकदा नक्की वाचा. तुम्हाला मगाशी पडलेल्या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असे आहे. परंतु, आपले सर्व बोलणे हे जाहिरात करणारी मंडळी ऐकत असते. तुमच्या फोनमध्ये, स्मार्ट टीव्हीमध्ये किंवा इतर स्मार्ट उपकरणांमधील असणाऱ्या माईकच्या मदतीने, या जाहिरात कंपन्यांना ग्राहकांचा डाटा मिळण्यास मदत होते, असे कॉक्स मीडिया ग्रुपच्या [CMG – Cox Media Group] एका रिव्ह्यूमधून समजते. ‘ॲक्टिव्ह लिसनिंग’ हा पर्याय निवडल्यानंतर, ग्राहकांच्या प्रत्यक्षात होणाऱ्या संभाषणावरून CMG सारख्या कंपन्यांना अपेक्षित ग्राहक निवडण्यास आणि त्यांना सूचना देण्यास मदत होते. याची माहिती सर्वात पहिले ४०४ मीडियाने [404 Media] दिली होती; अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.
“व्हॉइस डेटा कसा काम करतो आणि याचा वापर तुम्ही तुमच्या व्यवसायात कसा करू शकता?” यावर CMG ने एक पेपर प्रसिद्ध केला होता. या पेपरच्या सुरुवातीला, “तुम्हाला, सतत आपल्या गरजांबद्दल बोलत असणाऱ्या ग्राहकांच्या संभाषणांमधून त्यांच्या गरजांची माहिती झाली तर याचा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये किती फायदा होऊ शकतो? नाही ही कोणतीही कल्पना नाही, तर हे व्हॉइस डेटामधून शक्य होऊ शकते आणि CMG कडे याचा फायदा व्यवसायामध्ये करून घेण्याची क्षमता आहे”, असे काहीसे लिहिलेले आहे.
हेही वाचा : सॅमसंग स्मार्टफोन वापरताय? प्रायव्हसी अन् सुरक्षा वाढवण्यासाठी ‘या’ सेटिंगचा उपयोग करा, पाहा ही ट्रिक
“याचा अर्थ, जेव्हा कुणी सुट्ट्यांबद्दल, स्वयंपाकघरात हव्या असणाऱ्या नवीन गोष्टींबद्दल किंवा कोणते SUV मॉडेल सर्वोत्तम आहे, याबद्दल चर्चा करत असेल तेव्हा त्यांच्याजवळपास एखादे स्मार्ट उपकरण असण्याची सहज शक्यता असते”, अशा आशयाची माहिती त्या पेपरमध्ये लिहिली असल्याचे समजते.
“हे ऐकण्यासाठी फार विचित्र वाटते नाही का? परंतु, एखाद्या व्यवसायासाठी मात्र हे खूपच फायद्याचे आहे”, असेसुद्धा पुढे म्हटले आहे.
तुम्हालाही ऐकून भयंकर वाटलं असेल, पण विचार करा, कधी तरी तुमच्यासोबत असे घडले असेल ना? म्हणजे तुम्ही कुणाशी तरी प्रत्यक्षात, समोरासमोर एखाद्या वस्तूबद्दल, कपडे, चप्पल, फोन, पाण्याची बाटली… अशा अगदी कोणत्याही गोष्टींबद्दल बोलत असता आणि अचानक काही वेळातच, तुमच्या फोनवर तुम्ही काही बघत असताना, त्याच वस्तूंच्या जाहिराती येणास सुरुवात होत असते. तुम्ही ती ठराविक वस्तू सर्च केलेली नसतादेखील आपाओप एखादा व्हिडीओ, फोटो पाहताना किंवा सोशल मीडियावर सर्फिंग करत असताना त्यांची जाहिरात तुमच्या फोनवर झळकते आणि तुम्हाला काही क्षणांसाठी, ‘माझा फोन माझे बोलणे ऐकतोय का?’ असा प्रश्न पडतो.
यापूर्वी ही केवळ एक शंका होती, मात्र CMG नुसार अनेक जाहिरात कंपन्यांचे आपल्या ग्राहकांचा डेटा मिळवण्यासाठीचे हे एक साधन असल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या वेबसाईटनुसार, ‘ॲक्टिव्ह लिसनिंग’ हे आर्टिफिशल इंटेलिजन्स [AI] च्या मदतीने स्मार्ट फोन, स्मार्ट टीव्ही किंवा इतर स्मार्ट उपकरणांमधून संबंधित माहिती ओळखली जाते. त्यानंतर विविध सोशल मीडिया, गुगल इत्यादींवरून ग्राहकांना जाहिराती दाखवल्या जातात.
हेही वाचा : नवीन वर्षात वाढणार गाड्यांचे भाव; कोणत्या गाड्यांच्या किमतीत होणार किती वाढ, जाणून घ्या
असे काही करण्यामुळे, व्यक्तीच्या प्रायव्हसी आणि इतर गोष्टींवर कायदेशीर प्रश्न उभे राहतील असे मात्र CMG ला वाटत नाही. “हे कायदेशीर आहे का?, तर हो.” असे करणे कोणताही कायदा मोडत नसल्याचे CMG च्या वेबसाईटवरून समजते. “कारण – कोणतेही ॲप डाऊनलोड करताना किंवा फोन अपडेट करताना, वापरकर्ता सर्व ‘टर्म्स अँड कंडिशन्स’ मान्य [एक्सेप्ट] करतो.”
आता, जाहिरात करणाऱ्यांना हा डेटा नेमका कसा मिळतो किंवा इतर कोणकोणत्या उपकरणांमध्ये हे टूल वापरले जाते, याबद्दल इतर कोणतीही माहिती नाही. परंतु, अनेक फोनमधे सेल्फी कॅमेऱ्याच्या बाजूला असणारा हिरवा लाईट, कॅमेरा किंवा माईक चालू असेल तेव्हा तुम्हाला त्याची माहिती देतो. त्यामुळे CMG सारख्या कंपन्या हे फिचर असतानासुद्धा आपला डेटा कसा घेऊ शकतात याबद्दल प्रश्न पडतो. असे आणि यांसारखे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात असतील. परंतु, त्यांचे समाधान केव्हा होईल हे सांगता येत नाही. मात्र आत्तापर्यंत किमान,’माझा फोन माझे बोलणे ऐकतो का?’ या प्रश्नाचे उत्तर तरी आपल्याला मिळाले आहे असे म्हणू शकतो.