भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) हवामानाची अचूक माहिती देणारा उपग्रह आज (१७ फेब्रुवारी) प्रक्षेपित (लाँच) केला आहे. आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इनसॅट ४ डीएस हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे. या वर्षातील इस्रोचं हे दुसरं यशस्वी लाँचिंग आहे. यापूर्वी १ जानेवारी २०१४ रोजी पीएसएलव्ही-सी५८/एक्स्पोसॅट मोहिमेचं यशस्वी लॉन्चिंग करण्यात आलं होतं. या मालिकेतला शेवटचा उपग्रह इनसॅट ३ डीआर हा ८ सप्टेंबर २०१६ रोजी प्रक्षेपित करण्यात आला होता.
इनसॅट-३डीएस कार्यान्वित झाल्यानंतर हा उपग्रह पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांना माहिती आणि सेवा प्रदान करेल. हा उपग्रह भारतीय हवामान विभाग (IMD), नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशियन टेक्नोलॉजी (NIOT) नॅशनल सेंटर ऑफ मीडियम रेंज वेदर फोरकॉस्टिंग आणि भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती विभागाला लागणारी हवामानाबाबतची वेगवेगळ्या प्रकारची माहिती प्रदान करेल. हा उपग्रह अवकाशात नेणाऱ्या रॉकेटची लांबी केवळ ५१.७ मीटर इतकी आहे.
या मोहिमेची माहिती देताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले, १० नोव्हेंबर २०२३ पासून आम्ही इनसॅट-३डीएस च्या चाचण्या करण्यास सुरुवात केली होती. हा उपग्रह ६-चॅनेल इमेजर आणि १९-चॅनेल साऊंडद्वारे हवामानाशी संबंधित माहिती आपल्याला प्रदान करेल. संशोधनासाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. तसेच आपत्तीकाळात बचावासाठी लागणारी माहितीदेखील याद्वारे आपल्याला मिळेल.
हे ही वाचा >> मोफत जेवण, झोपण्याची सोय… मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा ‘हा’ VIDEO पाहून नेटकरी विचारतायत अर्ज कसा करू?
या मोहिमेच्या उद्दिष्टांविषयी सोमनाथ म्हणाले, इनसॅट ३डी आणि इनसॅट ३डीआर हवामानाशी संबंधित नवी माहिती जलदगतीने आपल्यापर्यंत पोहोचवेल. हा उपग्रह हवामानाचा अंदाज, जमीन आणि समुद्राच्या पृष्ठभागावर बारीक लक्ष ठेवेल. तसेच आपत्तीची पूर्वसूचना देईल. या उपग्रहाद्वारे आपत्तीकाळत बचावासाठी लागणारी माहितीदेखील आपल्याला मिळत राहील.