आत्तापर्यंतच्या सर्वात महत्वकांक्षी मोहिमेच्या दिशेने आज इस्रो आज एक पाऊल पुढे टाकणार होते. गगनयान मोहिमेअंतर्गत २०२५ मध्ये इस्रो स्वबळावर भारतीय अंतराळवीर भारताने बनवलेल्या अवकाश यानाद्वारे अवकाशात पाठवणार आहे. ज्या अवकाश यानातून अंतराळवीर अकाशात जाणार आहे त्या अवकाश यानाच्या आपातकालीन सुटकेची चाचणी आज श्रीहरीकोटा इथे केली जाणार होती.
आज सकाळी ८ वाजता नियोजित उड्डाण होते. याची घोषणा दोन दिवस आधीच इस्रोने केली होती. मात्र आज सकाळी ही वेळ ८.१५ अशी करण्यात आली. त्यानंतर मोहिमेचे थेट प्रक्षेपण सुरु झाले तेव्हा ८.४५ ला अवकाश यानाच्या आपातकालीन सुटकेची चाचणी केली जाणार असल्याचं इस्रोने जाहिर केलं.
मात्र ८.४५ ला अवघे पाच सेकंद बाकी असतांना ही चाचणी कॉम्प्युटरने स्वंयंचलित पद्धतीने सुचना देत थांबवली. ” काय नेमकं झालं त्याचा शोध घेऊ, यान सुरक्षित आहे. आम्ही लवकरच अपडेट सांगू. कॉम्पुटरने काऊट डाऊन थांबवले आहे. प्रत्यक्ष यानाच्या ठिकाणी पोहचल्यावर आम्ही पहाणी करु, विश्लेषण करु आणि टेस्टच्या पुढच्या वेळेची घोषणा करु ” अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिली आहे.
आज चाचणीत काय होणार होते?
आज एका विशिष्ट रॉकेटद्वारे अवकाश यान हे ११.७ किलोमीटर उंचीवर नेले जाणार होते. या उंचीवर अवकाश यान हे मुख्य रॉकेटपासून वेगळे होणार होते. त्यानंर प्राप्त झालेल्या वेगामुळे हे यान १६.७ किलोमीटर उंची गाठणार होते, त्यानंतर अवकाश यान हे ज्यावर आरुढ झाले आहे त्यापासून वेगळे होणार होते. लगेचच अवकाश यानातील एक पॅराशूट बाहेर येणार असे नियोजन होते. यामुळे अवकाश यान हे स्थिर होणार होते आणि जमिनीकडे येणारा वेग कमी होणार होता. त्यानंतर ते पॅराशूट वेगळे झाल्यावर यानावर असलेले मुख्य पॅराशुट बाहेर पडणार होते. त्या पॅराशूटच्या सहाय्याने हे अवकाश यान श्रीहरिकोटापासून १० किलोमीटर अंतरावर समुद्रात अलगद उतरण्याचे नियोजन होते. त्यानंतर नौदलाच्या युद्धनौका हे अवकाश यान जमिनीवर आणणार होते. अशी ही सर्व मोहिम साधारण ९ मिनिटात होणार होती.
यानाच्या आप्तकालीन सुटकेची चाचणी का महत्त्वाची?
अवकाश यान हे रॉकेच्या अग्रभागावर टोकावर असते. जर उड्डाणाच्या वेळी किंवा उड्डाण झाल्यावर रॉकेटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर रॉकेटचा लगेचच स्फोट होण्याची शक्यता असते. कारण रॉकेटमध्ये कित्येक हजार टन असं अत्यंत ज्वलनशील इंधन असते. तेव्हा अकाशयानातील अंतराळवीरांची सुरक्षा महत्त्वाची ठरते. तेव्हा हे अवकाश यान लगेचच मुख्य रॉकेटपासून वेगळं होत आणि दूर जात सुखरूप पृथ्वीवर परतणार असं नियोजन असते. तेव्हा हीच चाचणी आज होणार होती जी तांत्रिक बिघाडामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.