ISRO SpaDeX satellites docking experiment success : इस्रोने यशाचं आणखी एक शिखर सर केलं आहे. जमिनीपासून सुमारे ३५० किलोमीटर उंचीवर अंतराळात SpaDeX च्या SpaDeX A आणि SpaDeX B या दोन उपग्रहांची जोडणी करण्यात इस्रोने यश मिळवलं आहे. पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारे हे दोन उपग्रह अचूकरित्या एकमेकांना जोडले गेले. तेव्हा अवकाशात उपग्रहांची, अशा यानांची जोडणी करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. असं तंत्रज्ञान अमेरिका, चीन, रशिया या देशांकडे आहे.
SpaDeX म्हणजे Space Docking Experiment. या मोहिमे अंतर्गत इस्रोने प्रत्येकी २२० किलोग्रॅम वजनाचे SpaDeX A आणि SpaDeX B हे दोन उपग्रह ३० डिसेंबरला श्रीहरिकोटाहून यश्स्वी प्रक्षेपित केले. हे दोन उपग्रह अवकाशात प्रक्षेपित झाल्यावर एकमेकांपासून सुमारे २० किलोमीटर अंतर राखत पृथ्वी प्रदक्षिणा करत होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने यामधील अंतर कमी करण्यात आले. सात आणि नऊ जानेवारीला या उपग्रहांच्या जोडणीसाठी प्रयत्न करण्यात आले. पण काही तांत्रिक कारणांमुळे ही जोडणी पुढे ढकलण्यात आली. अखेर भारतीय वेळेनुसार आज सकाळी दोन उपग्रहांची जोडणी करण्यात यश आल्याचं इस्रोने जाहिर केलं आहे.
उपग्रहांच्या जोडणीचे महत्व काय ?
भविष्यात चांद्रयान ४ ही मोहिम आखली जाणार आहे, यात चंद्रावरील माती आणि दगड हे पृथ्वीवर आणले जाणार आहे. एक यान चंद्रावरील माती गोळा करेल आणि ही माती एका कुपीतून चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या दुसऱ्या एका यानाशी जोडत त्या यानाकडे सुपूर्त करेल. आणि मग ते यान ती कुपी पृथ्वीवर आणेल. अशा मोहिमेत अवकाशात दोन यानांची जोडणी होणे आवश्यक आहे आणि याच तंत्रज्ञानाची चाचणी आजच्या SpaDeX मोहिमेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
तसंच २०२८ नंतर भारत स्वतःचे अवकाश स्थानक उभारणार आहे. हे अवकाश स्थानक पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालेल, यात अंतराळवीरांचे वास्तव्य असेल, तिथे विविध प्रयोग आणि तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. तेव्हा या अवकाश स्थानकाच्या उभारणीसाठी SpaDeX च्या मोहिमेतून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग होणार आहे.
हे तंत्रज्ञान आव्हानात्मक का आहे?
अंतराळात अवकाश यानांची किंवा उपग्रहांची जोडणी करतांना संबंधित यानांचा वेग हा अतिशय जास्त असतो. आज जोडण्यात आलेले SpaDeX A आणि SpaDeX B हे दोन उपग्रह हे सेकंदाला सात किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने अंतराळात फिरत होते. तेव्हा दोघांमधील अंतर १५ मीटर एवढे सुरुवातीला कमी करण्यात आले. त्यानंतर हे अंतर आणखी कमी करत तीन मीटरपर्यंत आणले. त्यानंतर उपग्रहांवरील सर्व यंत्रणा तपासत ही जोडणी करण्यात आली. अशा या तंत्रज्ञानावर हुकूमत मिळवणं हे अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यात इस्रोने यश मिळवलं आहे.
आता यापुढे SpaDeX A आणि SpaDeX B या दोन्ही उपग्रहातील यंत्रणांची तपासणी केली जाईल आणि परत हे उपग्रह वेगळे केले जातील. पुढील दोन वर्षे ही मोहिम सुरु ठेवण्याचे इस्रोचे नियोजन आहे.