Jio Extends Validity Of Most Popular Plan: जून महिना अखेरीस रिलायन्स जिओ व एअरटेलने मोबाईल रिचार्ज प्लॅन सेवा महाग केल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली. ३ जुलैपासून या दूरसंचार कंपन्यांनी सर्व मोबाइल रिचार्ज प्लॅनच्या किमतीत २५ टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. त्यामुळे प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही युजर्सना रिचार्ज करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. पण हे बघता, जिओने सोमवारी आपल्या सर्वांत लोकप्रिय रिचार्ज प्लॅनमध्ये काही बदल केले आहेत. काही नवीन प्लॅनसह ओटीटी सबस्क्रिप्शनदेखील जाहीर केले आहेत.
तर, कंपनीने जाहीर केल्याप्रमाणे जिओचा महिन्याच्या ३४९ रुपयांच्या प्लॅनची वैधता २८ दिवसांवरून ३० दिवस तर ९९९ रुपयांच्या प्लॅनला ९८ दिवसाची वैधता देण्यात आली आहे. जिओचा ३४९ रुपयांचा प्लॅन हा सर्वांत स्वस्त प्लॅन आहे; ज्याची 5G नेटवर्क, अमर्यादित कॉलिंग, २ जीबी ४ जी डेटा व ३० दिवसांची वैधता, अशी वैशिष्ट्ये आहेत.
जिओच्या १,१९९ रुपयांच्या प्लॅनच्या बदल्यात कंपनीने ९९९ रुपयांचा नवीन प्लॅन सादर केला आला आहे ; ज्यामध्ये ८४ दिवसांची वैधता, ३ जीबी 4G डेटा प्रतिदिन दिला जात होता. पण, आता याचे शुल्क तेच ठेवून, १४ अतिरिक्त दिवसांची वैधता देण्यात आली आहे. फक्त ३ जीबीऐवजी या प्लॅनमध्ये २ जीबीसह ४जी डेटा दिला जाणार आहे.
त्याचप्रमाणे जिओ ९४९ रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता, २ जीबी ४जी डेटा मर्यादा, ५जी ॲक्सेस आणि मोफत डिस्नी + हॉटस्टार सबस्क्रिप्शन देण्यात येणार आहे आणि १०४९ रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता, २जीबी ४जी, अमर्यादित ५जी डेटा आणि मोफत सोनी लाइव्ह, झी ५ सबस्क्रिप्शनचीही ऑफर देण्यात आली आहे.
हे नवीन प्लॅन्स सध्याच्या प्लॅनपेक्षा वेगळे नसले तरी वैधतेच्या बाबतीत ग्राहकांना फायदे मिळवून देत आहेत. उदाहरणार्थ- यापूर्वी एखाद्याला ३४९ रुपयांचा प्लॅन वर्षातून १३ वेळा रिचार्ज करावा लागत होता. पण, प्लॅन अपडेट केल्यावर आता फक्त १२ वेळाच रिचार्ज करावा लागेल. त्याशिवाय जिओने ५जी बोनस प्लॅनदेखील सादर केले आहेत; ज्यांची किंमत ५१, १०१, व १५१ आहे; जे वापरकर्त्यांना १/१.५ जीबी ४जी डेटासह अमर्यादित ५जी डेटाची ऑफर देऊ करतात.