Jio installs 1 lakh towers in india: रिलायन्स जिओ ही सध्या भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. मुकेश अंबानी यांच्या या कंपनीचे ग्राहक सध्या देशभरामध्ये पसरले आहेत. या कंपनीद्वारे भारतामध्ये 4G नेटवर्कची सुविधा सुरु करण्यात आली होती. त्यांच्या या कृतीमुळे टेलिकॉम क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ग्राहकांसाठी 5G नेटवर्कची सेवा सुरु केली. ग्राहकांना या नेटवर्कचा अनुभव घेता यावा म्हणून जिओमार्फत भारतभर १ लाख टॉवर्सची उभारणी केली आहे. हा आकडा त्यांच्या अन्य प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेमध्ये पाचपट आहे. दूरसंचाल विभागाच्या एका अहवालानुसार, जिओकडे ९९,८९७ बीटीएस (Base transfer station) आहेत. याविरुद्ध भारती एअरटेल या त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपनीकडे २२,२१९ बीटीएस आहेत. या आकड्यांवरुनच जिओने स्पर्धेमध्ये किती पुढे आहे हे दिसून येते.
भारतामध्ये डाउनलोड स्पीडमध्ये होणार ११५ टक्क्यांनी वाढ
Ookla या नेटवर्क इंटेलिजेंस आणि कनेक्टिव्हिटी इनसाइट्समधील जागतिक आघाडीच्या कंपनीद्वारे २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, डाउनलोडच्या बाबतीत एअरटेलच्या 268 एमबीपीएसच्या रेटच्या तुलनेमध्ये जिओची हायस्पीड 506 एमबीपीएस इतकी आहे. या अहवालामध्ये त्यांनी म्हटले की, मागील तीन-चार महिन्यांपासून भारतामध्ये 5G नेटवर्कची सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. टेलिकॉम क्षेत्रामध्ये झालेल्या या प्रगतीमुळे मोबाइलच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडणार आहेत. 5G नेटवर्क लॉन्च झाल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये डाउनलोडच्या स्पीडमध्ये ११५ टक्क्यांनी वाढ झाली. सप्टेंबर २०२२ मध्ये डाउनलोड स्पीड 13.87 एमबीपीएस इतका होता. पुढे जानेवारी २०२३ मध्ये यात वाढ होऊन ती स्पीड 29.85 एमबीपीएस इतकी झाली.
रिलायन्स जिओ, भारती एअरटेल यांच्याप्रमाणे भारतातील इतर टेलिकॉम कंपन्यांनीही 5G नेटवर्क सुविधा सुरु करण्याबाबत निर्णायक पाऊल उचलले आहे. सध्या जिओद्वारे दिली जाणारे 5G नेटवर्क सर्वात प्रभावी आहे. कोलकातामध्ये जानेवारी २०२३ मध्ये 500 एमबीपीएसपेक्षा जास्त वेगवान 5जी डाउनलोड स्पीडची नोंद करण्यात आली होती. जिओद्वारे कोलकातामध्ये 506.25 एमबीपीएस हायस्पीड असलेल्या 5G नेटवर्कची सुविधा पुरवली जाणार आहे. कोलकातासह दिल्ली, मुंबई व अन्य शहरांमध्येही वेगवान नेटवर्क पसरवण्याचे जिओचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या भारत ही टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये भारतात 5G नेटवर्क लॉन्च करण्यात आले होते.