आजच्या युगात सर्व काही ऑनलाईन पद्धतीने केले जाते. परंतु या ऑनलाइन व्यवहारामुळे ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) पद्धतीने होणाऱ्या ऑनलाइन व्यवहारात सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक करत आहेत. गुगल पे, पेटीएम, फोन पे इत्यादी ऑनलाइन पेमेंट अॅप्स वापरत असाल तर सावधान राहा. साध्या चुकीमुळे देखील तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. ऑनलाइन पेमेंट अॅप्स वापरताना कोणत्या पाच सोप्या मार्गांनी पैसे सुरक्षित ठेवता येईल, जाणून घेऊया…
स्क्रीन लॉक
मजबूत स्क्रीन लॉक, पासवर्ड किंवा पिन केवळ तुमच्या फोनसाठीच नाही तर सर्व पेमेंट किंवा आर्थिक व्यवहार अँप्ससाठीही ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. हे केवळ तुमचा फोन चुकीच्या हातात येण्यापासून वाचवत नाही तर वैयक्तिक आणि महत्त्वपूर्ण तपशील लीक होण्यापासून देखील मदत करते.
पिन शेअर करू नका
तुम्ही तुमचा पिन कधीही कोणाशीही शेअर करू नका. तुमचा पिन उघड झाला आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही तो ताबडतोब बदलला पाहिजे.
आणखी वाचा : वेगवेगळ्या वेबसाईट्सचा पासवर्ड लक्षात राहत नाही? Google चे ‘पासकी’ फीचर वापरून लगेच व्हा चिंतामुक्त
फेक कॉल्स घेऊ नका
तुम्ही फेक कॉल उचलणे देखील टाळा. कॉलर तुमच्या बँकेतून किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून कॉल करत असल्याची बतावणी करतो आणि तुम्हाला तुमचे तपशील जसे की पिन, ओटीपी इ. विचारू शकतो.
लिंक्सवर क्लिक करणे टाळा
काही अनव्हेरिफाईड लिंक असलेले बरेच बनावट संदेश तुमच्या इनबॉक्समध्ये येत राहतात. तुम्ही अशा लिंक्सवर क्लिक करणे टाळावे कारण यामुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
एकाच वेळी अनेक पेमेंट अॅप्लिकेशन्स वापरणे टाळा
तुम्ही तुमच्या फोनमध्ये एकापेक्षा जास्त पेमेंट अॅप्लिकेशन्स ठेवणे टाळावे आणि प्लेस्टोअर किंवा अॅप स्टोअर वरून फक्त विश्वसनीय आणि सत्यापित पेमेंट ऍप्लिकेशन्स इंस्टॉल करावे.