जग प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी मिळवल्यानंतर एकापाठोपाठ एक निर्णय घेतल्याने कंपनीमध्ये गोधळाचे वातावरण तयार झाले आहे. मस्क यांनी जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. त्यानंतर मस्क यांच्या धोरणांशी सहमत नसलेले अनेक लोक नोकरी सोडण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे. अशात ट्विटरमधून काढण्यात आलेल्या मनुष्यबळाला ट्विटरची प्रतिस्पर्धी असलेली एक भारतीय कंपनी संधी देणार आहे.
भारतीय मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ ‘कू’ने ट्विटरच्या माजी कर्मचाऱ्यांना नोकरी देणार असल्याचे म्हटले आहे. ‘कू’चे सह – संस्थापक मयंक बिदावतका यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. आम्ही ट्विटरच्या काही माजी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवू. जिथे त्यांच्या प्रतिभेची कदर केली जाते तिथे ते काम करण्यासाठी पात्र आहेत, असे ट्विट मयंक यांनी केले आहे. तसेच, मायक्रो – ब्लॉगिंग हे लोकांच्या शक्तीबद्दल आहे, दमनासाठी नाही, असेही मयंक यांनी म्हटले.
(आता ग्रुपमध्ये घडवता येणार पोल, व्हॉट्सअॅपमध्ये असे करा तयार)
मुदती आधी कर्मचाऱ्यांनी सोडली नोकरी
‘ट्विटर’चे नवे मालक जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’ कर्मचाऱ्यांना नोकरी सोडायची की नाही? हे ठरवण्यासाठी गुरुवापर्यंतची मुदत दिली होती. मात्र, मुदतीआधी शेकडो कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यांचे आगाऊ वेतन घेऊन कंपनीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, खुद्द कंपनीच गोंधळल्याचे चित्र निर्माण झाले आणि उर्वरित कर्मचाऱ्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.
‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, मस्क यांनी दिलेल्या गुरुवारी ५ वाजेपर्यंतच्या मुदतीआधी शेकडो कर्मचाऱ्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात मस्क आणि त्यांचे काही सल्लागार यांनी कर्मचाऱ्यांच्या राजीनामासत्राची गंभीर दखल घेऊन त्यांना कंपनी सोडण्यापासून परावृत्त करण्यासाठी बैठकाही घेतल्या. मस्क यांनी कंपनीच्या ‘दूरस्थ कार्यपद्धती’ धोरणा (रिमोट वर्क पॉलिसी) संदर्भात गोंधळ निर्माण करणारे काही ट्वीट संदेश प्रसारित केल्याने गोंधळात आणखी भर पडली, असे ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे.