भारताची अंतराळ संशोधन संस्था – इस्रो ( ISRO ) ही गगनयान ( gaganyaan ) मोहिमेच्या माध्यमातून भारतीय अंतराळवीर स्वबळावर पाठवण्याच्या तयारीत आहे. स्बबळावर अंतराळीवर अवकाशात पाठवले तर असं करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनीच अवकाशात स्बबळावर अंतराळवीर पाठवले आहेत. अवकाशात अंतराळवीर पाठवणे अवघड आहे कारण अंतराळवीरांसह अवकाशात पाठवण्यासाठी शक्तीशाली रॉकेट -प्रक्षेपक असणे आवश्यक असते. तसंच अवकाशात जात अंतराळवीरांना जमिनीवर सुखरुप आणणारी अवकाश कुपी किंवा यान आवश्यक असते. अवकाश तंत्रज्ञानातील प्रगत देश युरोपिअन स्पेस एजन्सी, जपान, कॅनडा यांना हे अजून शक्य झालेले नाही. आता ते साध्य करण्याचा प्रयत्न भारत करणार आहे.

आतापर्यंत किती अंतराळवीरांनी अवकाशात प्रवास केला आहे?

उपलब्ध आकडेवारीनुसार ४० पेक्षा जास्त देशांच्या सुमारे ६०० अंतराळवीरांनी अवकाशात म्हणजेच पृथ्वीच्या वातावरणाबाहेर प्रवास केला आहे. रशिया, अमेरिका या देशांनी फक्त त्यांच्या देशातील नागरीक-संशोधकांना नाही नाही तर इतर देशांच्या नागरीकांनाही अवकाशाची सफर घडवली आहे. भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी १९८४ ला तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या यानातून अवकाशात प्रवास केला होता. अमेरिकेच्या १२ अंतराळवीरांनी तर चंद्रावर पाऊल ठेवले आहे. तर गेल्या काही वर्षात अमेरिकेतील स्पेस एक्स, Blue Origin, Virgin Galactic सारख्या खाजगी कंपन्यांनी स्वबळावर अवकाशात मानवी मोहिमा आखल्या आहेत, पृथ्वीच्या वातावरणाबाहेर अंतराळवीरांना नेत जमिनीवर सुखरुप आणलं आहे.

Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
loksatta kutuhal interesting facts about the first dinosaur of india
कुतूहल : भारतातील पहिलावहिला डायनोसॉर
spadex satellites successfully come 3 meters to each other says isro
‘स्पाडेक्स’ मोहिमेत दोन्ही उपग्रह तीन मीटर अंतरावर
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….
dinasorus highway
१६ कोटी वर्ष जुना ‘डायनासोर हायवे’ काय आहे? शास्त्रज्ञांना याचा शोध कसा लागला?
Loksatta kutuhal Founder of the Paleontological Institute
कुतूहल: पुराजीवविज्ञान संस्थेचे संस्थापक

अवकाशात जाणार पहिला मानव – अंतराळवीर कोण?

सोव्हिएत रशियाच्या युरी गागारिन हा अवकाशात ( १२ एप्रिल १९६१ ला ) जाणार पहिला माणूस ठरला. रशियाच्या Vostok 1 या मोहिमेद्वारे चार हजार ७२५ किलोग्रँम वजनाच्या यानातून युरी हा Baikonur Cosmodrome या आत्ताच्या कझाकिस्तानमध्ये असलेल्या तळावरुन अवकाशात झेपावला आणि ८९ मिनिटांनी पृथ्वीला जेमतेम एक प्रदक्षिणा पूर्ण करत उड्डाण केलेल्या ठिकाणापासून दीड हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावाजवळ उतरला. हे उड्डाण मानवाच्या अवकाश प्रवासाची नांदी ठरले. त्यानंतर एका महिन्यातच म्हणजे ५ मे १९६१ ला अमेरिकने अंतराळवीर अवकाशात पाठवला.

आता मुद्दा हा आहे की रशिया किंवा अमेरिका या देशांनी थेट अवकाशात माणसाला – अंतराळवीराला पाठवलं का ? तर त्याचे उत्तर नाही असं आहे. अवकाशात थेट मनुष्याला पाठवण्याआधी असा अवकाश प्रवास करणे किती आव्हानात्मक आहे, काय अडचणी असतांत, काय तंत्रज्ञान विकसित करावे लागेल याची चाचपणी ही विविध सजीवांना अवकाशात पाठवत करण्यात आली.

अवकाश स्पर्धा

दुसरं महायुद्ध झाल्यावर भांडवलशाली अमेरिका आणि कम्युनिस्ट सोव्हिएत रशिया या बलाढ्य देशांनी प्रत्येक ठिकाणी – प्रत्येक क्षेत्रात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. रशियाने ४ ऑक्टोबर १९५७ ला जगातील पहिला कृत्रिम उपग्रह यशस्विरित्या अवकाशात पाठवला आणि दोन देशांमधील शीत युद्धाला एक नवे मैदान हे अवकाशाच्या रुपाने मिळाले, जमिनीवरची स्पर्धा आता अंतराळात सुरु झाली. त्यानंतर चार महिन्यातच अमेरिकेने त्या देशाचा पहिला उपग्रह अवकाशात पाठवला. आता सर्वांचे लक्ष लागले होते पहिला माणूस अंतराळात कोण पाठणार याकडे.

अर्थात हे एवढे सोपे नव्हते. मुळात अंतराळ म्हणजेच पृथ्वीच्या वातावरणाबाहेर काय आहे, तिथली परिस्थिती कशी आहे, पृथ्वीभोवती फिरणे शक्य आहे का , तिथे सौर ऊर्जा किती प्रभावी आहे, पृथ्वीवर परतणे कितपत आव्हानात्मक आहे…वगैरे असे अनेक प्रश्न त्यावेळी अनुत्तरीत होते, अज्ञात होते. यातुनच पहिला सजीव हा प्राणी रुपात पाठवत चाचपणी करण्याचे ठरवले गेले.

त्याआधी अमेरिका आणि रशिया यांनी विविध रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात विविध सजीव पाठवले होते खरे पण तेही अत्यंत अल्प काळाकरता किंवा अवघ्या काही मिनिटांकरता. म्हणजे रॉकेटच्या अग्रभागावर एका कुपीत-यानात दोन्ही देशांनी विविध प्रकारच्या माशा, माकड, उंदीर, ससे, कुत्रे पाठवले होते. काही किलोमीटर ( ११० किलोमीटर जास्तीत जास्त ) उंची गाठल्यावर लगेचच या कुपीचा जमिनीच्या दिशेने प्रवास सुरु व्हायचा. तेव्हा अशा प्रयोगांमुळे अवकाश प्रवासाचे पुरेस मूल्यमापन झाले नाही.

तेव्हा अशा सजीवांना पाठवतांना जो मनुष्यांसारख्या भावभावना व्यक्त करेल आणि अवकाशात दीर्घ काळ तग धरु शकेल याकडे लक्ष द्यायला अमेरिका आणि रशिया यांनी सुरुवात केली.

अकाशात जात पृथ्वीप्रदक्षिणा घालणार पहिला सजीव Laika dog

पहिला उपग्रह पाठवल्यावर रशियाने सजीव अवकाशात दीर्घ काळ पाठवण्याच्या मोहिमेत अमेरिकेविरोधात आघाडी घेतली. अवकाश प्रवासात वातावरणातील तापमानाचे आणि परिस्थितीचे चढउतार लक्षात घेता प्रतिकूल परिस्थितीत टीकाव धरेल अशा प्राण्याची निवड करणे आवश्यक होते. तेव्हा यासाठी चक्क रशियाची राजधानी मॉस्कोच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या तीन भटक्या श्वानांची निवड केली. कारण हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असलेल्या मॉस्कोमध्ये उघड्यांवर रहाणे, मिळेल ते खाणे असं आयुष्य जगणारे भटके श्वान हे प्रतिकूल परिस्थितीत तग धरुन रहातील याची खुणगाठ बांधत त्यांना पुढील काही दिवस आवश्यक प्रशिक्षण देत अवकाश प्रवासासाठी तयार करण्यात आले. ज्या अवकाश यानातून पाठवले जाणार आहे त्याची सवय व्हावी यासाठी दिवसाचे काही तास अवकाश यानात विशिष्य स्थितीत ठेवण्याचे प्रयोगही करण्यात आले. या तीन श्वानांचे रक्तप्रवाह, त्यांची प्रकृती, त्यांच्या सवयी, गुरुत्वाकर्षण शक्तीला प्रतिसाद देण्याची त्यांची क्षमता तपासण्यात आली. यातून अवघ्या पाच किलो वजनाच्या Laika नावाच्या श्वानाची ( कुत्रीची – female dog ) निवड करण्यात आली.

Laika चा प्रवास कसा होता?

सुमारे ५०० किलो वजनाच्या स्फुटनिक २ या यानाच्या माध्यमातून Sputnik रॉकेटद्वारे Laika ३ नोव्हेंबर १९५७ ला अवकाशात झेपावली. हा one way ticket असाच प्रवास होता. हे अवकाश यान पृथ्वीवर परत आणण्याचे कोणतेही नियोजन नव्हते. यानामध्ये Laika च्या फार हालचाली होऊ नये यासाठी विशिष्ट प्रकारे तिला स्थितीमध्ये जखडून ठेवण्यात आले होते, तिच्यावर विविध प्रकारचे सेंसर्स लावण्यात आले होते. अवकाशात झेपवतांना तिच्या रक्तदाब तिपटीने वाढल्याची नोंद करण्यात आली. Laika ने तीन तास गुरुत्वाकर्षण विरहित अवस्थेचा अनुभव घेतल्याची नोंद करण्यात आली. यानाने पृथ्वी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर काही तासातच तापमान नियंत्रण करणाऱ्या प्रणालीत बिघाड झाला आणि यानातील तापमान वाढायला सुरुवात झाली. अशा अवस्थेततही तिेथे ठेवण्यात आलेले अन्न तिने खाल्ले. मात्र सहा तासानंतर साधारण पाच पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केल्यावर Laika जिवंत असल्याची कोणतीही खूण दिसली नाही. तेव्हा तिला मृत घोषित करण्यात आले.

स्फुटनिक २ ने पुढील १६२ दिवसांत पृथ्वीभोवती २५७० प्रदक्षिणा पूर्ण केल्या. शेवटच्या काही दिवसांत त्याची उंची गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे कमी होत होती आणि अखेर १४ एप्रिल १९५८ ला हे यान पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट झाले.

मात्र Laika च्या या प्रवासामुळे, पृथ्वी प्रदक्षिणांमुळे आणखी सजीव अवकाशात पाठवण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्या अनुभवावर आधारीत पुढील काही महिन्यात रशियाने आणखी काही कुत्रे , ससे, उंदीर अवकाशात पाठवले. त्यातून मिळालेल्या अनुभवाच्या पाठबळावर युरी गागरीनने या पहिल्या मानवाने अवकाश प्रवास पूर्ण करत मनुष्यासाठी प्रवासाचे नवे दालन खुले करुन दिले.

आज रशियात विविध ठिकाणी Laika ची स्मारके उभी करण्यात आली आहेत. एवढंच नाही तर जानेवारी २००४ मध्ये अमेरिकेच्या नासाचा Opportunity नावाचा रोव्हर हा मंगळ ग्रहावर उतरला, या रोव्हरने माती परिक्षणासाठी जी जागा निवडली त्याला Laika असे नाव देत या श्वानाचा एक प्रकारे गौरव करण्यात आला.

सध्या सहजपणे सुरु असलेल्या अंतराळवीरांच्या अवकाश प्रवासाची मुहुर्तमेढ ही Laika या श्वानाच्या अवकाश प्रवासाने, पृथ्वी प्रदक्षिणेने झाली असं म्हंटलं तर ते चुकीचे ठरणार नाही. आजच्या दिवशी म्हणजेच ३ नोव्हेंबर १९५७ ला या अवकाश प्रवासाचा, पहिल्या पृथ्वी प्रदक्षिणेचा टप्पा गाठला गेला होता. त्या ऐतिहासिक मोहिमेचं महत्व सांगण्याचा हा एक छोटा प्रयत्न.

Story img Loader