Apple कंपनीने नुकतेच भारतात आपली रिटेल स्टोअर्स ओपन केली आहेत. मुंबई आणि दिल्ली येथे सीईओ टीम कुक यांच्या हस्ते या दोन्ही रिटेल स्टोअरचे उदघाटन करण्यात आले आहे. या रिटेल स्टोअर्समुळे देशामध्ये १ लाख रोजगार निर्माण होऊ शकतील असा अंदाज आहे. कंपनीने २०२२ मध्ये देशातील पहिले ऑनलाईन स्टोअर उघडले होते. मुंबईच्या अॅपल स्टोअरच्या भिंतींवर मुंबईच्या काळी -पिवळी टॅक्सी कलेतून प्रेरित पेंटिंग्ज साकारण्यात आल्या आहेत. याशिवाय अॅपल बीकेसी क्रिएटिव्हमध्ये अॅपलची अनेक उत्पादने आणि सेवा देखील कोरल्या आहेत.
Apple ने देशातील आपली रिटेल स्टोअर्स सुरु केल्यानंतर आता मोबाईल उत्पादक असणारी कंपनी Nothing कंपनीसुद्धा भारतात आपली स्टोअर्स सुरु करण्याचा विचार करत आहे. कंपनीने नुकताच जगभरामध्ये आपला एकच स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीचा स्मार्टफोन ट्रान्सपरंट फोन म्हणूनही ओळखला जातो. Nothing Phone 1 या फोनमध्ये कंपनीने यामध्ये १० वेगवेगळे सॉफ्टवेअर अपडेट आणले आहेत.
नथिंग इंडियाचे उपाध्यक्ष आणि जनरल मॅनेजर मनू शर्मा यांनी सांगितले, ”कंपनी आपल्या पहिल्या स्मार्टफोनमधून बरेच काही शिकली आहे. ज्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे त्या सर्व गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे.” ते म्हणाले की कंपनी या वर्षी आपला दुसरा स्मार्टफोन म्हणजेच Nothing Phone 2 लॉन्च करणार आहे जे उद्योगातील आघाडीचे डिव्हाईस असणार आहे. मनु शर्मा म्हणाले की, आता फ्लिपकार्टवर नथिंग फोन 1 चे रेटिंग ४.४ झाले आहे जे पूर्वी ४.२ इतके होते. नथिंगने काही काळापूर्वी नथिंग इअर 2 लॉन्च केले जे ANC सह येते.
स्टोअर कधीपर्यंत उघडणार ?
मनू शर्मा म्हणाले, कंपनीचा स्मार्टफोन सध्या देशामधील २,००० पेक्षा जास्त स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. जसे जसे आमच्या प्रॉडक्टचे पोर्टफोलियो वाढत जाईल तसतसे कंपनी पुढील वर्षी भारतात त्यांचे रिटेल स्टोअर देखील उघडू शकते. सध्या, कंपनी आपल्या आगामी स्मार्टफोन, नथिंग फोन 2 वर लक्ष केंद्रित करत आहे, जो या वर्षी लॉन्च होऊ शकतो.