Simple Steps To Recover Your Aadhaar Card Number : सध्या आधार कार्ड प्रत्येक कामासाठी गरजेचं आहे, असं म्हणायला हरकत नाही. अगदी नोकरीवर रुजू होताना ते अगदी बँकेची ठराविक कामं करताना आधार कार्ड मागितलं जातं. पण, आपल्याकडून अनेकदा हे महत्त्वाचं कागदपत्र गहाळ होतं. मग एखादं महत्त्वाचं काम करायला जाताना ‘माझं आधार कार्ड कुठे आहे?’, असं विचारून घरात शोधाशोध सुरू होते. जर तुमचंही आधार कार्ड हरवलं असेल, तर आता घरबसल्या तुम्ही आधार क्रमांक (Aadhaar Card Number ) किंवा नोंदणी क्रमांक सहज मिळवू शकता. पण, आधार कार्ड नंबर मिळविण्यासाठी तुम्हाला पुढील सहा स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. कोणत्या आहेत या सहा स्टेप्स चला पाहू…
१. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या :
सर्वप्रथम गूगल ओपन करा आणि ॲड्रेस बारमध्ये http://www.uidai.gov.in टाईप करा. नंतर तुमच्यासमोर युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) चे अधिकृत संकेतस्थळ येईल. हे अधिकृत संकेतस्थळ आहे, जिथे तुम्ही तुमच्या आधार कार्डाविषयीची संबंधित माहिती मिळवू शकता.
२. रिट्रिव्ह लॉस्ट यूआयडी / ईआयडी :
UIDAI अधिकृत संकेतस्थळाच्या होम पेजवर, ‘Retrieve Lost UID/EID’ हा पर्याय शोधा. हा पर्याय सहसा ‘आधार सेवा’ (Aadhaar Services) विभागात आढळतो. त्यावर क्लिक करा. तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुम्ही हरवलेलं आधार कार्ड पुन्हा मिळविण्याची प्रक्रिया सुरू करू शकता.
३. तुमची वैयक्तिक माहिती द्या :
तुमची ओळख पटविण्यासाठी तुम्हाला काही वैयक्तिक माहिती देण्यास सांगितली जाईल. त्यामध्ये तुमचे पूर्ण नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबरचा समावेश असेल. तुम्ही जो मोबाईल नंबर एंटर केला आहे, तोच तुमच्या ‘आधार’वर नोंदणीकृत आहे ना याची खात्री करून घ्या. कारण- या नंबरवर OTP (वन-टाइम पासवर्ड) पाठविला जाईल.
४. दोन पर्याय दिले जातील :
तुम्हाला आधार कार्ड क्रमांक किंवा नावनोंदणी आयडीमध्ये नक्की काय रिट्रिव्ह करायचं आहे त्यावर क्लिक करा. जर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक हवा असल्यास, ‘आधार क्रमांक‘ (यूआयडी) पर्याय निवडा. जर तुम्हाला नावनोंदणी क्रमांक हवा असल्यास ‘आधार नोंदणी क्रमांक (ईआयडी) हा पर्याय निवडा.
५. ‘ओटीपी पाठवा’वर क्लिक करा :
ओटीपी पाठवा या बटणावर क्लिक करा. तुमच्या आधारबरोबर लिंक करण्यात आलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला सहा अंकी ओटीपी पाठविला जाईल. संकेतस्थळावर दिलेल्या फील्डमध्ये हा ओटीपी टाका. OTP बरोबर तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा सुरक्षा कोडदेखील टाकावा लागेल. एकदा तुम्ही हा तपशील भरलात की, पुढे जाण्यासाठी ‘सबमिट करा’वर क्लिक करा.
६. आधार किंवा नोंदणी क्रमांक तुमच्यापर्यंत येईल :
तुमच्या वैयक्तिक माहितीची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार किंवा नोंदणी क्रमांक पाठवला जाईल. या ऑनलाइन प्रक्रियेदरम्यान तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार हा क्रमांक वा नंबर तुम्ही दिलेल्या ईमेल पत्त्यावर किंवा मोबाइल क्रमांकावर पाठविला जाईल.
तर अशा प्रकारे या सोप्या स्टेप्स फॉलो करून, तुम्ही घरबसल्या आधार (Aadhaar Card Number ) किंवा त्याचा नोंदणी क्रमांक ( Enrollment number) मिळवू शकता.