प्रायव्हसीच्या बाबतीत फेसबुक आणि अॅपलमध्ये खटके उडतच आहेत, मात्र झुकरबर्ग यांच्या एका कृतीमुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. फेसबुक चालवणाऱ्या मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या नव्या जाहिरात मोहिमेत ‘आयमेसेज’ हे व्हॉट्सॅपच्या तुलनेत कमी सुरक्षित आणि खासगी असल्याचा दावा केला आहे.
झुकरबर्ग यांनी एका पोस्टमधून ही माहिती शेअर केली आहे. ही पोस्ट त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर पोस्टमध्ये एका जाहिरातीचा फोटो देखील आहे. त्यामध्ये आय मेसेजमध्ये झळकणाऱ्या हिरव्या आणि निळ्या बबलची तुलना थेटे व्हॉट्सअॅपच्या ‘प्रायव्हेट’ बबलशी करण्यात आली आहे.
(आता व्हॉट्सअॅपमध्ये एडिट करता येईल मेसेज, लवकरच मिळणार ‘हे’ ५ भन्नाट फीचर)
झुकरबर्ग यांनी केली ही टीका
मेसेजमध्ये, आय मेसेजच्या तुलनेत व्हॉट्सॅप हे अधिक सुरक्षित आणि खासगी आहे. त्यामध्ये एन्ड टू एन्ड इन्क्रिप्शन मिळत असून आयफोन आणि अँड्रॉइड या दोन्ही फोन्ससाठी ते उपलब्ध आहे. यामध्ये ग्रुप चॅटचा देखील समावेश आहे, असे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. तसेच व्हॉट्सअॅप हे सर्व चॅट मिटवू शकतो आणि त्यात ते ‘एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड बॅकप’सह उपलब्ध आहे, असे शेवटच्या वाक्यात म्हणत झुकरबर्ग यांनी अॅपलच्या आयमेसेजवर ताशेरे ओढले आहे. आय क्लाउड बॅकपमध्ये एन्ड टू एन्ड इन्क्रिप्शन उपलब्ध नाही, कदाचित हे हेरूनच त्यांनी शेवटच्या वाक्यावर जोर दिला आहे.
यामुळे टिकेची झोड
अमेरिकेत अॅपलचे आयमेसेज खूप लोकप्रिय आहे. काही अहवालांनुसार, तरुणाई आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अॅपलचे हे अॅप प्रचंड लोकप्रिय आहे. हे चित्र पालटण्याच्या दृष्टीने असले प्रयत्न ‘मेटा’कडून कदाचित होत असावे.
यूएसमध्ये युजरबेस वाढवण्याची तयारी?
व्हर्जनुसार, ही खासगी सुरक्षेशी संबंधित जाहिरात अमेरिकेतील सर्व ब्रॉडकास्ट टीव्ही, डिजिटल व्हिडिओ आणि सोशल मीडियावर झळकणार असल्याचे, मेटाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. यातून मेटा अमेरिकेत पाय घट्ट रोवण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
(काय आहे हॅशटॅग? इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवण्यासाठी ‘असा’ करा वापर)
अॅपल देखील मागे नाही
अॅपलने २०२१ मध्ये त्याचे अॅप ट्रॅकिंग ट्रान्सपरेन्सी फीचर लाँच केले होते. या अॅपमुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट सारख्या सोशल मीडिया कंपनींच्या जाहिरातींना फटका बसला आहे. दुसऱ्या अॅपवर किंवा संकेतस्थळावर युजरचा डेटा सोशल मीडिया कंपनीला ट्रॅक करता येऊ नये याची खात्री अॅपलच्या या अॅपने होते. या अॅपमुळे फेसबुकला मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचा अंदाज एका अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे अॅपलच्या आय मेसेजवर फेसबुकचे आगपाखड होणे स्वभाविक आहे.
अॅपलनेही अनेकदा फेसबुकवर टीका केली आहे. डेटा गोळा करण्यावरून अॅपलने फेसबुकवर नाव न घेता निशाणा साधला होता. अॅपलने नेहमी स्पर्धकांच्या तुलनेत आपले उत्पादन सुरक्षित असल्याचे अनेकवेळा म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर झुकरबर्ग यांची अॅपलवर खासगी सुरक्षेच्या बाबतीत केलेली टीका चर्चेचा विषय ठरणार आहे.
दरम्यान झुकरबर्ग यांनी मांडलेल्या मुद्यांमध्ये तथ्य आहे. व्हॉट्सअॅप बॅकअपसाठी एन्ड टू एन्ड इन्क्रिप्शन देते, ज्याचा अर्थ थर्ड पार्टी हा डेटा मिळवू शकत नाही. हे फीचर आयमेसेजमध्ये नाही. पण आयमेसेज आणि फेसटाईम कॉल देखील एन्ड टू एन्ड इन्क्रिपटेड आहेत, थर्ड पार्टी काय अॅपल स्वत: देखील ते मेसेज पाहू शकत नाही, हे विशेष.