सध्या जगभरामध्ये जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. यामध्ये Amazon , Google, Meta , Microsoft यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. अनेक कंपन्यांनी तर दोनवेळा कर्मचारी कपात केली आहे. आता यामध्ये देशांतर्गत मीशो कंपनीने देखील आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
मीशो या कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १५ टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच कंपनीने २५१ कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कंपनीचे Ceo विदित आत्रे यांनी एका इमेलच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. कंपनीला अधिक फायदा मिळवून देण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी इमेलमध्ये लिहिले आहे. सतत फायदा मिळवण्यासाठी आमहाला लहान संघटनात्मक संरचनांसोबत काम करायचे आहे असेही आत्रे म्हणाले.
कंपनीने एकूण काढून टाकलेल्या २५१ कर्मचाऱ्यांबद्दल सांगितले, नोकरी गेल्याने जे कर्मचारी प्रभावित झाले आहेत त्यांना कंपनी पूर्ण पाठिंबा देणार आहे. तसेच त्यांना एक सेपरेशन पॅकेजसुद्धा दिले जाणार आहे ज्यामध्ये कंपनी पदानुसार २.५ ते ९ महिन्यांचा पगार देणार आहे. त्यासोबतच विम्याचा लाभ, जॉब प्लेसमेंटसाथी मदत आणि ESOP चे फायदे समाविष्ट असणार आहे.
कंपनीच्या एका प्रवक्त्याने सांगितले, “मीशोच्या उभारणीत त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.” मीशो कंपनीने मागील वर्षी देशातील अनेक शहरांमधील ९० टक्क्यांपेक्षा अधिक सुपरस्टोअर्स बंद केले होते. त्यामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. सुपरस्टोअर्स बंद झाल्यामुळे ३०० जणांची नोकरी गेली होती.