कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय (AI) चा हळूहळू सर्वच क्षेत्रांमध्ये उपयोग करण्यात येऊ लागला आहे. औषध आणि व्यवसाय यांसारख्या क्षेत्रातील प्रगतीनंतर एआयने आता यूपीएससी (UPSC) सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी (प्राथमिक) परीक्षेवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यामध्ये काही निवडक उमेदवारच ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. परीक्षेच्या तीन फेऱ्यांनंतर उमेदवारांची निवड केली जाते. तर नुकत्याच झालेल्या यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी (प्राथमिक) परीक्षेत एआयच्या पढाई (PadhAI) ॲपने बाजी मारली आहे.
PadhAI नावाच्या AI ॲप्लिकेशनने UPSC नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २०२४ साठी IITians च्या टीमने (विद्यार्थ्यांनी) एक ॲप लाँच केला आहे. PadhaI ॲपने केवळ सात मिनिटांत संपूर्ण परीक्षेचा पेपर सोडवला आहे. तसेच हा पेपर सोडवल्यानंतर परीक्षेत २०० पैकी १७० गुण मिळवले आहेत. अहवालानुसार, या स्कोअरमुळे AI ॲप्लिकेशनला राष्ट्रीय स्तरावर टॉप १० स्कोअरर्समध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. हा स्कोअर कोणत्याही मानव किंवा AI मॉडेलने आतापर्यंत केलेल्या स्कोअरपेक्षा सगळ्यात जास्त असणार आहे.
PadhAI चे CEO कार्तिकेय मंगलम ॲपच्या कामगिरीबद्दल सांगताना म्हणाले की, ‘गेल्या दहा वर्षांतील यूपीएससी परीक्षेतील हे सर्वोच्च गुण आहे. कारण या परीक्षेत सरासरी १०० पेक्षा कमी गुणांचा सामान्य स्कोअर असतो. आमचा असा विश्वास आहे की, आमचा इव्हेंट हा अशा प्रकारचा पहिला असला, तरी काही वर्षांमध्ये अशा घटना सामान्य बनतील; कारण अनेक शैक्षणिक संस्था AI बरोबर झटपट आणि अचूकपणे पेपर सोडवण्याची शर्यत करत आहेत’ ; असे ते यावेळी म्हणाले.
यूपीएससी’ची प्राथमिक परीक्षा झाल्यानंतर रविवारी या ॲपने शिक्षणक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या समोर पेपर सोडवून दाखवला आणि २०० पैकी १७० गुण मिळवले आहेत; जी एक उत्तम कामगिरी आहे. ‘पढाई’ हे शैक्षणिक ॲप असून, यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी त्याचा वापर केला जातो. गूगल प्ले स्टोअरवर हे ॲप उपलब्ध आहे. यामध्ये एआय आधारित विविध सुविधा आहेत. त्यामध्ये बातम्यांचे सारांश, स्मार्ट पीवायक्यू सर्च, शंका निरसन, उत्तरांचे स्पष्टीकरण, पुस्तकांचे सारांश यांचा समावेश आहे.