सध्या जगभरामधील अनेक दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. तसेच अनेक कंपन्या आपला खर्च कमी करण्यासाठी आणि कंपनीला आधीपेक्षा अधिक कार्यसक्षम करण्यासाठी विविध प्रयत्न करताना दिसून येत आहेत.यामध्ये Meta कंपनी जी फेसबुक, इंस्टाग्राम यांची मूळ कंपनी आहे. मेटा कंपनी खर्च कमी करण्याच्या दृष्टीने ऑफिसमधील कॅफेटरियामध्ये मोफत अन्न देणे, मर्यादित स्वरूपातच नाश्ता देणे असे अनेक कार्यालयीन भत्ते कमी करत आहे. एका रिपोर्टनुसार मेटाला कर्मचाऱ्यांच्या ऑफिसच्या भत्त्यामध्ये कपात केल्यामुळे अनेक तक्रारींचा सामना करावा लागत आहे.
न्यू यॉर्क टाइम्सकडून आलेल्या अहवालानुसार, मेटाच्या कमर्चाऱ्यांनी कॅफेटेरियामधील काही गोष्टींमध्ये कपात करण्यात आल्यामुळे कंपनीकडे याबद्दल असंतोष व्यक्त केला आहे. ज्यामध्ये मोफत अन्नसेवा व इतर फायदे काढून टाकल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत.
हेही वाचा : ट्विटर विकत घेतल्याबद्दल खेद वाटतो का? Elon Musk म्हणाले, “हे माझ्यासाठी …”
सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या “कार्यक्षमतेचे वर्ष” अंतर्गत मेटाने खर्चात कपात करण्याचे प्रयत्न सुरू ठेवल्याने हे कटबॅक समोर आले आहेत. मागच्या वर्षी कंपनीने ११,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. तर नवीन वर्षांमध्ये देखील कंपनीने ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेबद्दल अनिश्चितता आणि चिंता वाटत आहे.
या रिपोर्टमध्ये हेही अधोरेखित करण्यात आले आहे, कर्मचाऱ्यांनी कपातीबद्दल मीम्स बनवण्याचा कसा अवलंब केला आहे. काही जणांनी तेथील कामाचे वर्णन “हंगर गेम्स” “लॉर्ड ऑफ द फ्लाईज” सारखे केले आहे. जिथे कर्मचार्यांना व्यवस्थापनास त्यांची योग्यता सिद्ध करण्याची आवश्यकता वाटते. इनसाईडरच्या रिपोर्टनुसार, मेटाने कॅफेटेरियामधील कार्यालयीन भत्त्यामध्ये कपात करण्याव्यतिरिक्त इतर कार्यालयीन भत्ते देखील कमी केले आहेत. ज्यामध्ये लॉंड्री आणि ड्राय क्लिनिंग सेवा, आरोग्याशी संबंधित काही सेवा, आणि अन्य बऱ्याच गोष्टींमध्ये कपात केली आहे.
दरम्यान , सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये परत यावे यासाठी वकिली करत आहेत. त्यांनी अलीकडेच एका मीटिंगमध्ये सांगितले, मेटा कंपनी रिमोट वर्कला समर्थन देणे सुरु ठेवेल. कंपनी कामगिरी डेटाचे विश्लेषण करेल आणि उन्हाळ्यात संभाव्यपणे तिचे धोरण अपडेट करेल.
टेक कंपन्यांमध्ये ऑफिसच्या भत्ते कमी करणारी मेटा ही पहिली कंपनी नसून, यामध्ये Google आणि Salesforce सारख्या इतर कंपन्यांनी देखील कर्मचाऱ्यांच्या अनेक सुविधांमध्ये कपात केली आहे . या भत्त्यांचा उपयोग स्पर्धात्मक राहण्यासाठी, कर्मचाऱयांनी कार्यालयात अधिक वेळ घालवावा यासाठी देण्यात यायचे. मात्र आता आर्थिक मंदी निर्माण झाल्यामुळे कंपन्यांनी त्यांच्या खर्चावर नियंत्रण आणले आहे.