ट्विटरपाठोपाठ मेटाअंतर्गत येणाऱ्या फेसबूकमध्ये मोठी कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. या आठवड्यात याबाबतची योजना आखण्यात येणार आहे. याचा परिणाम हजारो कर्मचाऱ्यांवर होणार आहे. कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने फेसबूकमध्ये होणाऱ्या कर्मचारी कपातीची माहिती रविवारी दिली. या माहितीनुसार मेटाने कर्मचाऱ्यांना याबाबत आधीच पुर्वकल्पना दिली होती. सप्टेंबरच्या अखेरीस मेटाने जगभरात ८७,००० हून अधिक कर्मचाऱ्यांची नोंद केली आहे. ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आणखी वाचा : Telegram वर मेसेज शेड्युल करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या स्टेप्स
सोशल मीडियाच्या गेल्या १८ वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे. गेल्या आठवड्यात अशीच कर्मचारी कपात ट्विटरमध्ये करण्यात आली, पण त्याचे प्रमाण ५० टक्के होते, जे फेसबूकमध्ये होणाऱ्या कर्मचारी कपातीच्या तुलनेत कमी आहे.
फेसबूकमध्ये होणाऱ्या कर्मचारी कपातीचे कारण काय?
मेटा गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटांचा सामना करत आहे, त्यामुळे खर्च कमी करण्याकडे कंपनीचा कल वाढला आहे. यावर्षी मेटाचे शेअर्स ७३ टक्क्यांनी घसरले आहेत. वर्चुअल रिऍलिटीहे भविष्यात सर्वात जास्त वापरले जाणारे तंत्रज्ञान आहे, भविष्याची गरज ओळखून मेटाने ‘मेटावर्स’हे नवे तांत्रिक, आभासी जग निर्माण करणाऱ्या प्लॅटफॉर्ममध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यातच जागतिक अर्थव्यवस्था मंदावली आणि महागाई वाढली आहे. त्यामुळे मेटाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. या कारणांमुळे फेसबूकमध्ये मोठया प्रमाणावर कर्मचारी कपात होणार आहे.