Meta Layoffs: सध्या जगभरामध्ये अनेक दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदी मुळे आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. सध्या सर्वत्रच कर्मचारी कपातीचे वारे वाहत आहे. फेसबुकचची मूळ कंपनी मेटा बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकच्या मूळ कंपनी Meta ने मागील वर्षी मोठ्या प्रमाणात टाळेबंदी केली होती. कंपनीने सुमारे ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. खर्च कमी करण्यासाठी टेक कंपनीने हे पाऊल उचलले होते. मात्र मेटा कंपनीने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. खर्च कमी करण्यासाठी मेटाने कस्टमर रिलेशन कंपनी Kustomer विकण्याचा निर्णय घेतला आहे. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी गेल्या वर्षीच ही कंपनी खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती.
Meta Platforms Inc ने शुक्रवारी सांगितले की ते ग्राहक सेवा कंपनी Kustomer साठी एक धोरणात्मक पर्याय शोधत आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये Meta ने Kustomer खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा करार १ अब्ज डॉलर्स (सुमारे ८ हजार कोटी रुपये) मध्ये झाला होता.
Reuters ला ईमेल केलेल्या निवेदनातून फेसबुकचे मालक झुकरबर्ग यांनी सांगितले की कंपनी सध्या Kustomer साठी धोरणात्मक पर्याय शोधत आहे. मेटा या प्रक्रियेदरम्यान ग्राहकांच्या उत्पादनांना आणि ग्राहकांना समर्थन देत राहील. मात्र मार्क झुकबर्ग यांनी हे स्पष्ट केले नाही की कंपनी कुस्टोमरच्या जागी कोणत्या प्रकारचे पर्याय शोधत आहे.
मेटा कस्टमर रिलेशन कंपनी Kustomer विकण्याचा विचार करत आहे. सोशल मीडिया कंपनी असणाऱ्या मेटाला फक्त त्यांच्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळेच कदाचित ते विविध व्यवसायांमधून बाहेर पडत आहेत. Kustomer व्यवसाय आणि उद्योगांना CRM हे सॉफ्टवेअर विकते. ज्याचा वापर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि इतर माध्यमांद्वारे ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी केला जातो. करोना महामारीच्या काळात यात प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मेटाने व्हाट्सअॅपच्या रेव्हेन्यूसह आपल्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या व्यवसायावर म्हणजेच मेसेजिंगवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.