मागील काही काळामध्ये अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. आता पुन्हा एकदा यामधील दिग्गज कंपनी असलेल्या Microsoft ने सोमवारी (१० जुलै) सकाळी अंतर्गत कर्मचारी कपातीची एक नवीन फेरी जाहीर केली आहे. ज्यामुळे ग्राहक सेवा,सपोर्ट आणि सेल्स विभागातील अनेक कर्मचारी प्रभावित झाले आहेत. १८ जानेवारी रोजी मायक्रोसॉफ्टने जागतिक स्तरावर १० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे जाहीर केले होते.
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे आर्थिक वर्ष हे जून २०२३ रोजी संपले. नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असताना व्यवसायाच्या काही भागांची पुनर्रचना करणे हे मायक्रोसॉफ्टसाठी काही असामान्य नाही. याबाबतचे वृत्त geekwire ने दिले आहे. कंपनीने geekwire च्या चौकशीला प्रतिसाद देताना अधिक माहिती न देता कपातीची पुष्टी केली.
””संघटनातम्क आणि कर्मचारी समायोजन हा आमचा व्यवसाय मॅनेज करण्यासाठीचा गरजेचा आणि नियमित एक भाग आहे. आम्ही आमच्या भविष्यासाठी आणि आमच्या ग्राहकांसाठी आणि भागीदारांच्या समर्थनात रणात्मक वाढीच्या क्षेत्रात प्राधान्य देणे आणि गुंतवणूक करणे सुरू ठेवू,” असे मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे.
कर्मचारी कपातीच्या स्वरूपावर असंख्य लिंक्डइन पोस्ट समोर आल्या आहेत. ज्यामध्ये या कर्मचारी कपातीच्या फेरीमुळे ग्राहक सेवा,सपोर्ट आणि सेल्स विभागातील अनेक कर्मचारी प्रभावित झाले आहेत.
याआधी टेक क्षेत्रामध्ये देखील अनेक दिग्गज कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये Amazon, Google , Meta आणि मायक्रोसॉफ्ट यासारख्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. काही कंपन्यांनी तर दोन वेळेस कपात केली आहे. जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत ही कर्मचारी कपात करण्यात येत आहे. सोशल प्लॅटफॉर्म असणाऱ्या Reddit कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५ टक्के म्हणजे ९० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामुळे आता अमेरिकेतील कर्मचाऱ्यांची कपात करणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये Reddit चा समावेश झाला आहे.