मायक्रोसॉफ्ट कंपनी लवकरच भारतात स्पेस टेक स्टार्टअपला चालना देण्यासाठी सज्ज आहे. भविष्यात होणाऱ्या तंत्रज्ञान शिखर परिषद २०२३ मध्ये Microsoft CEO सत्या नडेला यांनी क्लाउड आधारित आणि AI पॉवरवर चालणारे प्रोजेक्ट प्रदर्शित केले आणि स्पेस टेक डोमेनमध्ये भारतीय स्टार्टअप्सला चालना देण्याच्या स्कीम्स ओपन केल्या आहेत. तंत्रज्ञान साधने आणि प्लॅटफॉर्मचा वापर करून स्पेस टेक स्टार्टअपला चालना देण्यासाठी कंपनीने ISRO (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) शी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
या पार्टनरशिपमुळे मायक्रोसॉफ्ट ISRO ला देशातील अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअपचा अधिकाधिक फायदा घेण्याच्या दृष्टिकोनातून बळकट करण्यासाठी मदत करेल. भारतातील सर्वाधिक आशादायक अंतराळ तंत्रज्ञान निर्माते आणि उद्योजकांमधील बाजारपेठीय क्षमता हेरून त्यांना अधिक सक्षम करण्याचे इस्रोचे उद्दिष्ट साकार करण्याचा प्रयत्न या सहकार्यातून केला जाणार आहे. या सहकार्याच्या माध्यमातून इस्रोने निवडलेल्या अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप्सना मायक्रोसॉफ्ट फॉर स्टार्टअप्स फाऊंडर्स हब व्यासपीठावर समाविष्ट केले जाईल. या व्यासपीठाद्वारे स्टार्टअप्सना संकल्पना ते युनिकॉर्न अशा प्रत्येक टप्प्यावर साह्य केले जाते.
हेही वाचा : CES 2023: सॅमसंगने लाँच केले ‘हे’ एलईडी टीव्ही; जाणून घ्या खासियत
“भारतातील अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप्स आपल्या तंत्रज्ञानाच्या बळावर देशाच्या अंतराळ क्षमतांना वृद्धिंगत करण्यात लक्षणीय भूमिका बजावत आहेत. अंतराळ क्षेत्रात शक्य ते बदल वेगाने घडवण्यात इस्रोसोबत सहकार्य करणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आमची तंत्रज्ञान साधने, व्यासपीठे आणि मार्गदर्शनाच्या संधी या माध्यमातून आम्ही देशातील अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप्सना अत्याधुनिक नाविन्यपूर्ण निर्मिती आणि वैज्ञानिक शोधांना गती देण्यात सक्षम करण्यास बांधिल आहोत.” – अनंत महेश्वरी, अध्यक्ष मायक्रोसॉफ्ट इंडिया
हेही वाचा : आता पडलात तरीही घाबरायचे कारण नाही…, Google Pixel Watch ने आणलंय ‘हे’ फिचर
“मायक्रोसॉफ्टसोबत आम्ही केलेल्या या सहकार्यामुळे अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप्सना एआय, मशिन लर्निंग आणि डीप लर्निंग यासारख्या अत्याधुनिक पद्धतींचा वापर करून विविध अॅप्लिकेशन्ससाठी प्रचंड प्रमाणातील सॅटेलाइट डेटा वापरता येईल, त्याचे पृथ्थकरण करता येईल. अशा स्टार्टअप्सना आणि तंत्रज्ञान पर्याय पुरवणाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी मायक्रोसॉफ्ट फॉर स्टार्टअप्स फाऊंडर्स हब हे अत्यंत उपयुक्त व्यासपीठ आहे आणि यातून राष्ट्रीय अंतराळ तंत्रज्ञान परिसंस्थेला अधिकच बळकटी मिळेल. उद्योजकांना साह्य करून, त्यांना पाठबळ देऊन व्यापक पातळीवर एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एकत्र येत असल्याचा आम्हाला आनंद आहे.” -श्री. एस. सोमनाथ, इस्रो अध्यक्ष