Most Popular Password in 2022: तुमच्या डिजिटल अकाउंटला सुरक्षित ठेवण्यासाठी अलीकडे फक्त पासवर्ड पुरेसा ठरत नाही. अकाउंट हॅक होण्यासाठी आपण खुच फेमस असायला हवं किंवा तुमचे खूप फॉलोवर्स असायला हवे असेही नाही, अगदी शे- दोनशे फॉलोवर्स असलेले अकाउंटही आता सोशल मीडियावर हॅक होऊ शकतात. सोशल मीडियाचे अकाउंट हॅक झाल्यास काही स्टेप्सने आपण पुन्हा प्राप्त करू शकता मात्र जर तुमचे नेटबँकिंग किंवा ऑनलाईन पेमेंट संबंधित युपीआय अकाउंट हॅक झाले तर मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. या सर्व अकाऊंटच्या सुरक्षेसाठी पासवर्ड वापरताना खास काळजी घेणे गरजेचे आहे. अलीकडेच NordPass तर्फे भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व परिणामी सर्वात असुरक्षित अशा पासवर्डची यादी जरी करण्यात आली आहे.
बहुतांश मंडळी ही आपल्या अकाऊंटच्या पासवर्डसाठी नंबर व अक्षर असं कॉम्बो तयार करतात. भारतात वापरण्यात येणाऱ्या २०० हुन अधिक पासवर्डमध्ये अगदी सोप्पे कॉम्बो दिसून आले आहेत. NordPass ने हे पासवर्ड ओळखून हॅक करण्यासाठी लागणारा वेळही सांगितला आहे. प्राप्त माहितीनुसार googledummy हा पासवर्ड बहुतांश अकाउंटमध्ये वापरण्यात येतो व याला हॅक करण्यासाठी २३ मिनिटांचा वेळ लागतो. तसेच 123456 हा पासवर्ड हॅक करण्यासाठी १ सेकेंदाचा वेळ पुरतो. विशेष म्हणजे अद्यापही अनेकदा हेच पासवर्ड वापरले जातात.
अहवालानुसार २०२१ च्या तुलनेत यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पासवर्डच्या यादीत ७३ टक्के साम्य आहे. यंदाच्या यादीतील ८३ टक्के पासवर्ड हे एक सेकंदात हॅक करता येण्यासारखे आहेत. २०१७ मध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार सायबर क्राईमची सर्वाधिक प्रकरणे असणाऱ्या देशात भारताचा क्रमांक चौथा आहे.
सर्वाधिक वापरले जाणारे पासवर्ड
जगभरात ‘password’ व ‘123456’ हे सर्वाधिक वापरले जाणारे पासवर्ड आहेत तर ‘guest’, ‘qwerty’, ‘iloveyou’ , ‘111111’, ‘p@ssw0rd’ हे पासवर्डही या यादीत अनुक्रमे टॉप मध्ये आहेत. अनेकांना अक्षर व नंबर असा कॉम्बो सुरक्षित असल्याचे वाटते, मात्र ‘pass@123’ हा सर्वात सोपा व काही सेकंदात हॅक होण्यासारखा पासवर्ड आहे.
विश्लेषण: ट्विटरवर बनावट खात्यांचा सुळसुळाट, एलॉन मस्कही त्रस्त; कसे ओळखायचे फेक अकाऊंट्स?
जर आपल्याला एक सुरक्षित पासवर्ड तयार करायचा असेल तर त्यासाठी एक लोअरकेस अक्षर, एक अपरकेस अक्षर, एक नामाबर व एक चिन्ह असे कॉम्बिनेशन वापरण्याचा सल्ला सायबर तज्ज्ञ देतात. तसेच हे पासवर्ड तुमचे नाव, आडनाव, वाढदिवस अशा पद्धीतचे ठेवू नये याउलट सामान्य व संशय येणार नाही असे कॉम्बो निवडणे फायद्याचे ठरू शकते. शक्य असल्यास अकाउंटला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरावे, जेणेकरून तुम्ही पासवर्ड टाकल्यावर तुम्हाला मोबाईलवर किंवा ईमेलवर कोड पाठवला जाईल ज्यानुसार आपण अकाउंट वापरू शकता.