दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या घटना वाढत असून ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून लाखो रुपयांना गंडा घातला जात आहे. इंटरनेट बॅंकिंगद्वारे पैशांचं व्यवहार करणं काहींना चांगलंच महागात पडलं आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. नागरिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन लोकांना करण्यात येत आहे. पैशांचे व्यवहार ऑनलाईद्वारे करण्यासाठी सर्वात महत्वाचा असणारा ओटीपी शेअर करताना सर्वांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. असा संदेश देणारा एक व्हिडीओ मुंबई पोलिसांनी त्यांच्या इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर शेअर केला आहे.
अनोळखी व्यक्तींना ओटीपी शेअर न करण्याच्या सूचना मुंबई पोलिसांकडून नागरिकांना सातत्याने देण्यात येत आहेत. तसंच सोशल मीडियावरही याबाबत जनजागृती करून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येतं. मुंबई पोलिसांनी नुकतंच इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. नागरिकांनी फसवणूक होण्यापासून कसं सावधं राहावं, याबाबत पोलिसांकडून संदेश देण्यात आला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
दोन व्यक्ती एकमेकांसमोर उभे राहून ओटीपीबाबत सावधानतेचा इशारा देत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. “Scammers asking you for OTP” अशाप्रकारचा मेसेज एकाच्या बाजूला दाखवण्यात आला आहे. तर दुसरीकडे “You giving scammers your OTP.”अशा प्रकारचा मेसेज दिला आहे. दरम्यान, दोघंही या मेसेजला स्पष्टपणे नकार देताना या व्हिडीओमध्ये दिसतात. नागरिकांनी त्यांची वैयक्तीक माहिती आणि बॅंकेची महत्वाची माहिती कुणासोबतच शेअर करु नये, असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे.