Netflix हे एक ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये एक व्यक्ती अकाउंट ओपन करतो त्यासाठी सबस्क्रिप्शन घेतो. त्या अकाऊंटवर इतर सदस्य मनोरंजनाचा आनंद घेतात. ही नेटफ्लिक्सची कार्यपद्धती आहे. कदाचित याच कारणांमुळे स्ट्रीमिंग जायंट भारतीय वापरकर्त्यांसाठी एक लोकप्रिय प्लॅटफॉर्म बनला आहे. मात्र आता ही कार्यपद्धती बंद करण्यासाठी नेटफ्लिक्स उपाययोजना करत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म आता युजर्सना ईमेल पाठवून सांगत आहे की त्यांचे अकाउंट फक्त त्यांच्यासाठी आणि त्यांच्या घरातील सदस्यांसाठी आहे. त्यांच्या घराबाहेरील कोणी सदस्य ते अकाउंट वापरत असल्यास त्यांना आपल्या प्रोफाइलला एका नवीन अकाउंटमध्ये ट्रान्सफर करावे लागेल (ज्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतील) आणि आपला पासवर्ड बदलण्याचा विचार करावा लागेल.
Netflix या उपाययोजना कोणत्याही सूचनेशिवाय आणि अचानकपणे करत आहे. मात्र हे अनपेक्षित नाही. बऱ्याच दिवसांपासून नेटफ्लिक्स लवकरच वापरकर्त्यांमधील पासवर्ड शेअरिंग बंद करेल अशा बातम्या येत होत्या. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.
हेही वाचा : WhatsApp ने आणले मोठे अपडेट; आता नंबर सेव्ह न करताच अनोळखी व्यक्तीशी करता येणार चॅट
Netflix ने भारतात बंद केले पासवर्ड शेअरिंग
नेटफ्लिक्सने आपल्या एका नवीन ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले, “आजपासून, आम्ही हा ईमेल भारतातील त्यांच्या घराबाहेर नेटफ्लिक्स शेअर करणाऱ्या सदस्यांना पाठवणार आहोत. नेटफ्लिक्स अकाउंट हे एका कुटुंबाच्या वापरासाठी आहे. त्यात घरात असणारे प्रत्येक सदस्य हे वापरू शकतो. घरी असताना, बाहेर असताना, सुट्टीवर असताना ते कुठेही असले तरी नेटफ्लिक्स वापरू शकतात. तसेच ट्रान्सफर प्रोफाइल आणि ॲक्सेस व डिव्हाइसेस मॅनेज करण्यासाठी नवीन फीचर्सचा लाभ घेऊ शकतात.”
”आम्ही हे मानतो की आमच्या सदस्यांकडे मनोरंजनासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे आम्ही विविध प्रकारच्या नवीन चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत राहतो. Netflix वर पाहण्यासाठी तिथे नेहमीच काहीतरी समाधानकारक असते.”
Netflix वापरकर्त्यांनी काय करावे?
वापरकर्त्यांना सर्वात प्रथम आपले अकाऊंटची सिक्युरिटी आणि प्रायव्हसी सेटिंग्समध्ये जाऊन ‘अॅक्सेस आणि डिव्हाइस मॅनेज करा’ पर्याय निवडून त्यांच्या अकाउंटमध्ये कोणी कोणी लॉग इन केले आहे ते तपासणे आवश्यक आहे. त्यानंतर, वापरकर्त्यांनी ‘प्रवेश नसावा’ (should not have access) अशा डिव्हाइसमधून साइन आऊट करणे आणि त्यांचे पासवर्ड बदलणे आवश्यक आहे. जर का त्याच्या घरातील सदस्यांशिवाय बाहेरील कोणी सदस्य नेटफ्लिक्स अकाउंट वापरत असेल तर प्रोफाइल ट्रान्सफर केले जाऊ शकते.