फ्लिपकार्टवर अलिकडेच बिग बिलियन डे सेल सुरू झाला आहे. यामध्ये प्रिमियम फोन्ससह अनेक उपकरणांवर मोठी सूट मिळत आहे. अॅपलने नुकतीच आपली आयफोन १४ सिरीज लाँच केली आहे. अॅपलच्या आयफोनवर देखील फ्लिपकार्टकडून मोठी सूट मिळत आहे. मात्र, या विक्रीला गालबोट लागल्याचे दिसून आले. फ्लिपकार्ट सेलमध्ये आयफोन घेतल्यावर ऑर्डर कॅन्सल होत असल्याच्या तक्रारी काही ग्राहकांनी ट्विटरवर केल्या आहे.
या तक्रारी आयफोन १३ च्या बाबतीत आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये आयफोन १३ हा ५० हजारांपेक्षाही कमी किंमती मिळणार असल्याचे समोर आले होते. त्यामुळे, अनेकांना हा फोन मोठ्या बचतीसह घेण्याची संधी निर्माण झाली होती. मात्र, काही लोकांनी या सेलची तक्रार केली आहे. काही ग्राहकांनी आयफोन १३ चे ऑर्डर रद्द झाल्याची तक्रार केली आहे. केवळ इतकेच नव्हे तर काहींनी रिफंड उशिरा मिळत असल्याची देखील तक्रार केली आहे.
हा सेल खोटा, नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
भुवनेश शर्मा नावाच्या ट्विटर यूजरने आयफोन १३ ऑर्डर केल्याच्या तीन दिवसांनंतर ऑर्डर कॅन्सल झाल्याची तक्रार केली आहे. कस्टमर केअरकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे सांगत त्याने निराशा व्यक्त केली आहे. अभिषेक तिवारी या यूजरने हा खोटा सेल असल्याचे जाहीर केले आहे. कुठल्याही पूर्व सूचनेशिवाय फ्लिपकार्टने ऑर्डर रद्द केल्याचा दावा करत त्याने संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान फोनची कमतरता आणि वाढलेली मागणी या समस्येमागचे कारण असू शकते, असे काही मीडिया अहवालांतून पुढे आले आहे. भारतात आयफोनचा चाहता वर्ग मोठा आहे. आणि आता किंमती कमी झाल्याने अॅपलच्या मागणीतही प्रचंड वाढ होण्याची शक्यत आहे.
फ्लिपकार्ट म्हणाले..
फ्लिपकार्ट ही ग्राहकांना प्राधान्य देते. ग्राहकांचे हित जपले जात आहेत की नाही याची फ्लिपकार्ट नेहमी खात्री करते. गुंतूर, गोरखपूर, सिलिगुडी या शहरांमधून आलेली आयफोनची जवळपास ७० टक्के ऑर्डर्स यशस्वीरित्या विक्रेत्यांनी पूर्ण केल्याचे समजले आहे. काही कारणांमुळे केवळ काही किरकोळ ऑर्डर्स ही विक्रेत्यांकडून रद्द करण्यात आली होती. आमचे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म हे ग्राहक केंद्रित आहे. आम्ही विक्रेत्यांना ग्राहकांच्या ऑर्डर्सना प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहित करतो, असे फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने समस्येवर स्पष्टीकरण दिले.