iPhone म्हटलं की असंख्य आयफोन प्रेमींच्या डोळ्यांत वेगळीच चमक पाहायला मिळते. दर्जा, स्टेटस किंवा आणखी असंख्य कारणांसाठी जगभरातले लोक आयफोनला पसंती देतात. अॅपलच्या या प्रोडक्टनं जगभरातल्या मोबाईलप्रेमींना भुरळ घातली आहे. आयफोनचे लेटेस्ट मोबाईल फोन लाँच होताच विकलेही जातात. मात्र, तरीदेखील आयफोन प्रेमींचं या फोनवरचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. अॅपलचे फोन त्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष ओळखले जातात. पण आता याच फोनमधील एक नवीन बग तत्रज्ञांना सापडला असून त्यामुळे तुमचा आयफोन थेट क्रॅश होऊ शकतो!
नेमकं काय सापडलंय तंत्रज्ञांना?
iPhone मधील एक नवा बग सापडला असून त्यामुळे फोन क्रॅश होत असल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये विशिष्ट प्रकारचे कॅरेक्टर्स अर्थात अक्षरं, चिन्हं विशिष्ट क्रमाने टाईप केल्यास त्यामुळे फोन क्रॅश होत असल्याचं दिसून आलं आहे. मॅस्टोडोनमधील सुरक्षा तंत्रज्ञांनी ही बग शोधून काढल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
तुम्ही तुमच्या अॅपल फोनवर “”:: असं तुमच्या स्पॉटलाईट सर्चमध्येकिंवा अॅप लायब्ररीमध्ये किंवा सेटिंग्ज विंडोवरील सर्च बारमध्ये टाईप केल्यास तुमच्या फोनची सिस्टीम क्रॅश होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. तुम्ही असं केल्यास युझर इंटरफेस काम करेनासा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर थेट तुमचा फोन लॉक होतो. काही युजर्सच्या बाबतीत फोनची स्क्रीन काही काळासाठी पूर्णपणे ब्लँक झाल्याचंही इंडियन एक्स्प्रेसनं वृत्तात म्हटलं आहे.
चिन्हांचा कोणता क्रम ठरू शकतो धोकादायक?
आयफोनवर तुम्ही वर दिलेली चिन्हं विशिष्ट क्रमाने टाईप केल्यास त्याचा फोनवर परिणाम होऊ शकतो. यात “”: असं टाईप करून त्यापुढे एखादं अक्षर टाईप केल्यास त्यातून फोन क्रॅश होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. उदाहरणार्थ फोनवर “Anything at all”:x अशा क्रमाने या चिन्हांचा अक्षरांमध्ये किंवा शब्दांध्ये वापर केल्यास तुमचा अॅपल फोन क्रॅश होऊ शकतो.
CNET नं दिली आणखी सविस्तर माहिती
दरम्यान, CNET नं दिलेल्या माहितीनुसार, iOS 17 व iOs 18 बीटा या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीम्सवर हा बग तपासून पाहण्यात आला. मात्र, त्यापैकी iOs 18 बीटावर या बगचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचं दिसून आल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवाय, iPadOS 17.6.1 या लेटेस्ट अपडेटमध्ये होम स्क्रीनवर बग क्रॅश होण्याचा परिणाम होत नाही. पण त्याचवेळी अॅप लायब्ररीमधील स्प्रिंगबोर्डवर मात्र या बगचा परिणाम दिसून येत आहे.
Apple Price Cut: iPhone स्वस्त झाले; कोणतं मॉडेल, किती दर घटले? वाचा सविस्तर वृत्त!
याआधीही असे अनेक बग…
दरम्यान, याआधीही iPhone वर अशा अनेक बगचा हल्ला झाल्याचं दिसून आलं आहे. अनेकदा विशिष्ट प्रकारचा मजकूर फोनमध्ये आल्यामुळे हे बग कार्यान्वित होत असल्याचं दिसून आलं. पण यावेळी सापडलेला हा बग फक्त तुम्ही ती विशिष्ट चिन्हं विशिष्ट क्रमाने अक्षर वा शब्दांच्या मध्ये वापरली, तरच हे बग फोनवर परिणाम करतात.
Apple कडून अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे हा बग कोणत्याही प्रकारची सुरक्षेसंदर्भातली समस्या उभी करू शकेल असं वाटत नाही, असं सांगितलं जात आहे. कारण हा बग थेट तुमच्या iPhone वर हल्ला करू शकत नसून फक्त युजरनं ती चिन्हं फोनवर स्वत:हून टाईप केली, तरच त्यामुळे फोनमध्ये समस्या निर्माण होऊ शकते.