OpenAI या आर्टिफिशियल रिसर्च फर्मने अधिक प्रगत आणि अत्याधुनिक सुविधांना सज्ज असलेला नवा चॅटबॉट लॉन्च केला आहे. कंपनीद्वारे या अपडेटेड चॅटबॉटला ‘GPT-4’ असे नाव देण्यात आले आहे. मानवी आज्ञांचे पालन करताना हा चॅटबॉट अधिक प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये याचा योग्य प्रमाणात वापर होऊ शकतो असे म्हटले जात आहे. प्रतिमा (Image) आणि मजकूर (Text) स्विकारण्याची सोय या नव्या चॅटबॉटमध्ये करण्यात आली आहे.
चॅटजीपीटीच्या GPT-3.5 या व्हर्जनमध्ये प्रतिमा आणि मजकूर स्विकारण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. तसेच तो GPT-4 प्रमाणे सूक्ष्मपद्धतीने काम करण्यास सक्षम नसल्याची माहिती OpenAI च्या ब्लॉगमध्ये देण्यात आली आहे. तसेच ‘कठीण काम करताना GPT-4 अधिक विश्वासार्ह, सर्जनशील आणि जुन्या GPT-3.5 पेक्षा सूक्ष्म सूचना हाताळण्यास जास्त सक्षम आहे’ असेही त्यामध्ये लिहिलेले आढळते. सध्या GPT-4 हे चॅटजीपीटी प्लस सब्सक्राइबर्ससाठी Usage capसह उपलब्ध आहे.
या नव्या चॅटबॉटसह रोवन च्युंग या इसमाने संवाद साधला. तेव्हा त्याने GPT-4 कोणत्या क्षेत्रांमध्ये माणसांची जागा घेऊ शकतो असा सवाल केला. या प्रश्नाचे उत्तर देताना चॅटबॉटने डेटा इंट्री क्लार्क, प्रूफरीडर, कॉपीरायटर, मार्केट रिसर्च अॅनालिस्ट, सोशल मीडिया मॅनेजर अशा तब्बल २० क्षेत्रांमध्ये चॅटजीपीटी माणसांऐवजी काम करु शकतो असे म्हटले. गणितीय कौशल्ये, सर्जनशील लेखन, भाषा प्राविण्य यांसारख्या काही गोष्टींमध्ये तंत्रज्ञान माणसाला मागे टाकू शकते असेही GPT-4 ने सांगितले.
रोवन च्युंगने चॅटबॉटने दिलेल्या उत्तराचा फोटो ट्वीट केला आहे. या ट्वीटवर हजारो यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी GPT-4 च्या वक्तव्याशी सहमत नसल्याच्या कमेंट्स केल्या आहेत. काहीजणांनी स्वत:च्या नोकरीचे उदाहरण देत नव्या चॅटबॉटला खोटं ठरवण्याचा प्रयत्न देखील केला आहे. यावरुन भविष्यामध्ये तंत्रज्ञान आणि मनुष्यप्राणी यांच्यामध्ये संघर्ष होऊ शकतो असे म्हटले जात आहे.