१ जानेवारीपासून बँक ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मोफत मासिक मर्यादा संपल्यानंतर वाढलेले शुल्क लागू होईल. वाढीव शुल्काबाबत ग्राहकांना संबंधित बँकांकडून संदेश मिळत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जूनमध्ये घोषणा केली होती की देशातील बँकांना आता वापरकर्त्यांसाठी विनामूल्य मासिक मर्यादेपेक्षा जास्त रोख आणि नॉन-कॅश एटीएम व्यवहारांसाठी शुल्क वाढवण्याची परवानगी आहे. दरांमधील हा बदल १ जानेवारी २०२२ पासून लागू होईल.
एटीएममधून पैसे काढणं महागणार
आरबीआयने एटीएममधून मोफत व्यवहारानंतर रोख पैसे काढण्यावरील शुल्क वाढवण्यास मान्यता दिली आहे. बँका सध्या ग्राहकांकडून प्रति व्यवहारासाठी २० रुपये आकारतात. त्यात करांचा समावेश नाही. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, मोफत व्यवहारानंतर बँका त्यांच्या ग्राहकांकडून प्रति व्यवहार २० ऐवजी २१ रुपये आकारू शकतील. त्यात करांचा समावेश नाही. हा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे.
(हे ही वाचा: Google Pay New Rule : १ जानेवारीपासून ऑनलाइन पेमेंटशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार)
याशिवाय, मध्यवर्ती बँकेने बँकांना आर्थिक व्यवहारांसाठी प्रत्येक व्यवहारासाठी इंटरचेंज शुल्क १५ रुपयांवरून १७ रुपये आणि सर्व केंद्रांमधील गैर-आर्थिक व्यवहारांसाठी ५ रुपयांवरून ६ रुपये करण्याची परवानगी दिली होती. हे १ ऑगस्ट २०२१ पासून लागू झाले.