पोस्टाने लहान बचत योजनेतील ग्राहकांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. ज्याच्या मदतीने पोस्ट ऑफिस लहान बचत योजनेतील खातेदार कुठूनही त्यांच्या खात्याची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. यासाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा सक्रिय करण्याची गरज भासणार नाही, आता पोस्ट ऑफिसने लहान बचत योजनेच्या अकाउंट होल्डर्ससाठी ई-पासबुक ही सुविधा सुरु केली आहे.
ई-पासबुकमुळे लहान बचत योजनेअंतर्गत कोणताही खातेदार काही मिनिटांत आपला बॅलन्स तपासू शकतो. तुम्ही कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणाहून तुमच्या खात्याशी संबंधित माहिती जाणून घेऊ शकता. लोकांना चांगली सुविधा देण्यासाठी पोस्टाकडून ई-पासबुकचा निर्णय घेण्यात आला आहे. खातेधारकाला ई-पासबुक सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकाचा वापर करता येईल. विशेष म्हणजे, या सुविधेसाठी लहान बचत योजनांच्या खातेधारकांना कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. ही सुविधा त्यांना मोफत देण्यात येईल.
आणखी वाचा : तुमचं ‘आधार कार्ड’ दहा वर्ष जुना झाला असेल तर…आधारकार्ड धारकांसाठी UIDAI ची महत्त्वाची सूचना
या खातेदारांना घेता येईल ई-पासबुकचा लाभ
पीपीएफ ग्राहक तसेच सुकन्या समृद्धी योजनेसारख्या लहान बचत योजनमध्ये गुंतवणूक केलेले कोणतेही ग्राहक आपल्या खात्याची संपूर्ण माहिती काही मिनिटांमध्ये तपासू शकतात. ई-पासबुक सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे खात्याशी लिंक केलेला नोंदणीकृत क्रमांक असणे आवश्यक आहे. ई-पासबुकसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
ई-पासबुकद्वारे मिळणाऱ्या सुविधा
- या सुविधेच्या मदतीने तुम्ही तुमचा बॅलन्स तपासू शकता.
- ई-पासबुकद्वारे तुम्ही मिनी स्टेटमेंट डाऊनलोड करू शकता. सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफिस बचत खाते आणि पीपीएफ योजनांसाठी मिनी स्टेटमेंट्स उपलब्ध असतील. मिनी स्टेटमेंटमध्ये ग्राहकांना शेवटच्या १० व्यवहारांची माहिती मिळेल.
पीपीएफ, बचत खाते, सुकन्या समृद्धी खात्यातील बॅलन्स या पद्धतीने ई-पासबुकद्वारे तपासा
- सर्वात आधी तुम्हाला पोस्टाच्या indiapost.gov.in किंवा ippbonline.com यावर मोबाईल क्रमांक, कॅप्चा कोड टाकून लॉगिन करावे लागेल.
- यानंतर तुम्ही ई-पासबुक हा पर्याय निवडा.
- आता तुम्हाला या योजनेचा प्रकार, खाते क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि कॅप्चा टाकावा लागेल.
- OTP टाकून व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्ही बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, फुल स्टेटमेंट असे पर्याय निवडू शकता.
- ई-पासबुकचा वापर करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येत असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता.