सायबर क्राइम हा आजकाल चिंतेचा विषय झाला आहे. देशात सर्वत्र सायबर क्राईमची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात आपला वैयक्तिक डेटा चोरी होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. पण कधीकधी आपल्या नकळत अनपेक्षित ठिकाणाहून देखील मोबाईलमधील डेटा चोरी होऊ शकतो. याबाबत सावध करण्यासाठी ओडिशा पोलिसांनी एक ट्वीट केले आहे. काय आहे हे ट्वीट आणि कुठून डेटा चोरी होण्याची शक्यता आहे जाणून घेऊया.

आपण दिवसभरातील अनेक महत्वाची कामं मोबाईलवर करतो. त्याबरोबर चॅटींग, सोशल मीडिया सर्फिंग असा बराच वेळ आपण मोबाईलवर घालवतो. त्यामुळे मोबाईलची बॅटरी लगेच संपण्याची शक्यता असते. आपण घराबाहेर पडणार असू तर चार्जिंगची सोय आधीच करावी लागते. ऑफिसमधील सहकारी किंवा कुटुंबातील सदस्यांचे चार्जर आपण सहज वापरतो. आता तर अनेक सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध असतात. पण या चार्जिंग स्टेशन्सवर मोबाईल चार्ज केल्याने मोबाईलमधील डेटा चोरी होण्याची शक्यता असते. ओडिशा पोलिसांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.

आणखी वाचा : खुशखबर! जिओ, एअरटेल आणि वोडाफोनने लाँच केले ३० दिवसांसाठीचे रिचार्ज प्लॅन; किंमत जाणून घ्या

ओडिशा पोलिसांचे ट्वीट

‘मोबाइल चार्जिंग स्टेशन, युएसबी पॉवर स्टेशन इत्यादी सार्वजनिक ठिकाणी तुमचे मोबाईल चार्ज करू नका. सायबर फसवणूक करणारे तुमची वैयक्तिक माहिती मोबाईलवरून चोरण्याचा आणि तुमच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करत आहेत.’ अशी माहिती ट्वीटमध्ये देण्यात आली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार ओडिशा पोलिसांकडून सायबर चोरीबाबत एक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. ‘ज्यूस जॅकिंग’द्वारे मोबाईलमधून डेटा चोरी होण्याची शक्यता असल्याचे मत सायबर तज्ञांनी व्यक्त केले. सायबर फसवणूक करणारे सार्वजनिक यूएसबी चार्जिंग स्टेशनवर मालवेअर लोड करू शकतात, हा मालवेअर चार्ज होत असताना इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये प्रवेश करू शकतो.

आणखी वाचा : युट्यूब व्हिडीओ सुरू होण्याआधी दिसणार पाच जाहिराती? कंपनीने स्पष्टीकरण देत सांगितले…

पोलिसांनी सांगितले की, “काही लोक स्वतःचे चार्जर किंवा पॉवर बँक त्यांच्याबरोबर ठेवतात. पण तरीही बरेच लोक बस स्टँड, रेल्वे स्टेशन, मॉल्स आणि इतर ठिकाणी सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर अवलंबून असतात. अशा सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज केल्यास वैयक्तिक डेटा चोरी होण्याची शक्यता असते.”

Story img Loader