जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन मस्क ट्विटर कंपनी विकत घेतल्यापासून सातत्याने चर्चेत असतात. ट्विटरच्या खरेदीनंतर त्यांनी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. यानंतर ट्विटर मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्ममध्ये त्यांनी अनेक बदल केले. जे बदल अनेकांना गोंधळात टाकणारे होते नाहीतर धक्कादायक होते. यानंतरही मस्क ट्विटर कर्मचाऱ्यांसाठी नवीन निर्णय जारी करत आहेत. यातच एलॉन मस्क यांनी ट्विटर कर्मचाऱ्यांना रात्री २.३० वाजता एक ई-मेल पाठवला आहे. ज्यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्याबाबतचे एक फर्मान जारी केले आहे.
फॉर्च्युन मॅगझिनच्या रिपोर्टनुसार, ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या रिमोट वर्किंग पॉलिसीबाबत ई-मेलमध्ये माहिती दिली आहे. मस्क यांनी रात्री २.३० वाजता केलेल्या ई-मेलमध्ये कर्मचाऱ्यांसाठी ऑफिसला येणे ऑप्शनल नसल्याचे सांगत पुढे फ्रान्सिस्कोचे ऑफिस अर्ध्याहून अधिक रिकामे असल्याचे म्हटले आहे.
ट्वटिरचे व्यवस्थापकीय संपादक शिफर यांनी आपल्या ट्विटमध्ये ही सर्व माहिती दिली आहे. एलॉन मस्क यांचा घरून काम करण्यास अर्थात वर्क फ्रॉम होमला विरोध आहे, ही गोष्टी त्यांना अजिबात आवडत नाही. यापूर्वीही त्यांनी या गोष्टीला जाहीर विरोध केला आहे. याबाबत मस्क यांनी कर्मचाऱ्यांसाठी एक फर्मानही जारी केले होते.
इतकेच नाहीतर एलॉन मस्क यांनी ट्विटर कर्मचाऱ्यांना यापूर्वीही रात्री एक ई-मेल पाठवून कंपनीच्या पॉलिसीबाबत माहिती दिली होती. वॉशिंग्ट पोस्टच्या माहितीनुसार, मस्क यांनी त्या ई-मेलमध्ये कर्मचाऱ्यांना अधिक कट्टर बनण्याची गरज असल्याचे म्हटले होते. याशिवाय ट्विटर खरेदीनंतर लगेचच रात्री २ वाजता आणखी एक ई-मेल करत कर्मचाऱ्यांनी रात्री उशीरापर्यंत काम करण्यास प्रोत्साहित केले होते.
याशिवाय ऑक्टोबर २०२२ मध्ये ट्विटर विकत घेण्यासाठी मस्क यांनी अनेक मोठे निर्णय घेतले होते. गेल्यावर्षीच्या एका अहवालानुसार, एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना टेस्लाच्या ऑफिसमधून नोकरी सोडून जात इतरत्र नोकरी शोधण्याचे फर्मान काढले होते. या निर्णयामुळे टेस्ला कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला होता.
एलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर कंपनी विकत घेतली. ज्यानंतर ट्विटरच्या पॉलिसीमध्ये मोठे बदल तर केलेच पण तीन चतुर्थांश कर्मचाऱ्यांना तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकले. एका अहवालानुसार, मस्क आणखी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या विचारात आहेत.
याशिवाय ट्विटरच्या ब्लू बॅज व्हेरिफिकेशनसाठीही युजर्सकडून आता चार्ज घेतला जात आहे. ट्विटरच्या बिझनेस गोल्ड बॅजसाठी १००० रुपयांचा चार्ज घेतला जात आहे. तर ब्लू बॅजसाठी चार्ज न दिल्यास तो १ एप्रिलपासून सर्व व्हेरिफाय अकाउंटवरून रिमूव्ह केला जाईल.