ओला इलेक्ट्रिक कंपनी इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करते. या कंपनीने भारतातील आपल्या पहिल्या सेल गिगाफॅक्टरीवर काम सुरू केले आहे. याबद्दल ओला इलेक्ट्रिक या इलेक्ट्रिक वाहन निर्मात्याने शुक्रवारी माहिती दिली. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करत सांगितले की कंपनीने आपल्या पहिल्या सेल गिगाफॅक्टरीवर काम करण्यास सुरुवात केली आहे.
ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी दावा केला,” हा भारतातातील सर्वात मोठा आणि जगातील सर्वात मोठ्या सेल कारखान्यांपैकी एक असेल.” अग्रवाल यांनी केलेल्या ट्विटमध्ये प्लांटमध्ये काम करत असणाऱ्या कामगारांचा व्हिडीओ आणि फोटोदेखील त्यांनी शेअर केले आहेत. ओला इलेक्ट्रिक आपल्या पहिल्या सेल गिगाफॅक्टरीवर काम करत असल्याचे अग्रवाल यांचे ट्विट अशा वेळी आले आहे की, एलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी भारतात स्वतःचा कारखाना सुरु करण्यासाठी भारत सरकारशी चर्चा करत आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टूडे ने दिले आहे.
गेल्या वर्षी , ओलाच्या सीईओ यांनी घोषणा केली होती की, कंपनी २०२३ च्या अखेरपर्यंत आपली स्वतःची लिथियम-आयन सेल सुरू करण्याची योजना आखत आहे. हे लिथियम आयन से इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये वापरले जातात. सध्या भारतीय ईव्ही उत्पादक कंपन्या लिथियम-आयन बॅटरीसाठी चीन, तैवान, जपान आणि कोरियावर अवलंबून आहेत. ओला काम करत असलेल्या सेलची क्षमता ही ५ ही गिगावॅट इतकी असण्याची शक्यता आहे.
” आम्ही भारतातील पहिले आणि सर्वात मोठे लिथियम सेल उत्पादक असू. आम्ही गेल्या दोन वर्षांपासून ही टेक्नॉलॉजी तयार करत आहोत.आम्ही आधीच इतर देशांवर किंवा खेळाडूंवर अवलंबून न राहता आमची स्वतःची टेक्नॉलॉजी तयार केली आहे.” असे अग्रवाल म्हणाले.
ओला इलेक्ट्रिकची ही गिगाफॅक्टरी तामिळनाडू राज्यातील कृष्णगिरी येथे आहे. अग्रवाल म्हणाले होते, ”आम्ही लिथियम-आयन सेलसाठी कृष्णगिरीमध्ये एक मोठी गिगाफॅक्टरी उघडत आहोत. आम्ही याचा पहिल्यांदा आमच्या बाइक्ससाठी करणार आहोत आणि त्यातून कमाई करण्याचा विचार करू. त्यानंतर हे बाजारामध्ये उपलब्ध करू. ”