Gmail Account Hacked: शार्क टँकच्या माध्यमातून अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणारे अमेरिकन उद्योगपती म्हणजे मार्क क्युबन. पण, सध्या मार्क क्युबन एका अडचणीत सापडले आहेत. त्यांना गूगलवरून एक कॉल आला आणि काही क्षणांत त्यांचे जीमेल अकाउंट हॅक झाल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. पण, त्यांच्या या पोस्टनंतर मात्र नेटकऱ्यांनी पोस्टच्या खाली कमेंट्सचा पाऊस पडला आहे. नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊ…

शार्क टँक यूएस परीक्षक मार्क क्युबन यांना गुगलकडून ‘नोआ’ नावाच्या व्यक्तीनं कॉल केला. त्यानंतर गूगल रिकव्हरी मेथडद्वारे त्यांचं गूगल जीमेल खातं हॅक करण्यात आलं, असा दावा त्यांनी केला आहे. गूगलकडून बोलते आहे असे सांगून हा फेक कॉल अमेरिकन उद्योगपती यांना करण्यात आला.मार्क क्युबन यांनी त्याच्या फॉलोअर्सना शनिवारी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनंतर (PST) त्यांच्या ईमेल आयडीवरून कोणताही मेल प्राप्त झाल्यास, त्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आणि एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी सुंदर पिचाई यांना टॅग करीत एक संदेश लिहिला.

मार्क क्युबन यांनी याबद्दल माहिती देताना एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून पोस्ट करीत लिहिलं, “हाय गूगल, असं लिहून पुढे सुंदर पिचाई @sundarpichai यांना टॅग करीत लिहिलं की, माझं नुकतंच mcuban@gmail.com अकाउंट हॅक केलं गेलं आहे. कारण – गूगलकडून 650-203-0000 नोआ नावाच्या व्यक्तीनं कॉल केला आणि त्यानंतर माझं जीमेल अकाउंट हॅक झालं. दुपारी ३:३० नंतर mcuban@gmail.com वरून कोणाला काही मेल आले, तर ते मेल मी पाठवलेले नाहीत”, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली होती.

हेही वाचा…फक्त सात मिनीटात सोडवला UPSC चा पेपर; विद्यार्थ्यांनी लाँच केलेला हा AI ॲप निघाला हुश्शार; पाहा परीक्षेत किती मिळाले गुण ?

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

एक्स (ट्विटर)वरील एका युजरने मार्क क्युबनच्या पोस्टला उत्तर देताना असे सुचवले, “ही घटना खोट्या गूगल नंबरवर सेट केलेल्या फसव्या सिममुळे घडली असावी. 650-203-0000 सेट केलेल्या फसवणूक सिमद्वारे तुम्हाला कोणीतरी कॉल केला असण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत तुम्ही फक्त फिशिंगचे शिकार झाले आहात.” तर काही युजर्सनी गूगलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच एका युजरने कमेंट केली की, कदाचित सिम कार्ड फसवणूक झाली असावी. तिसऱ्या युजरने लिहिले, “फोन नंबर फसवणुकीचा गूगलशी काय संबंध?” आदी अनेक कमेंट्स नेटकरी पोस्टखाली करताना दिसून आले आहेत.