मुंबईमधील एक वृद्ध महिला दुबईचे विमान बुक करत असताना ती एका ऑनलाइन स्कॅमचा शिकार बनली असून महिलेला तब्ब्ल ४.४ लाखांचा फटका बसल्याचे समोर आले आहे. एका प्रसिद्ध वेबसाइटवरून ही महिला विमानाची तिकिटं बुक करत होती. मात्र, हॅकरने अत्यंत चलाखीने वेबसाइटचा अधिकृत फोन नंबर बदलून स्वतःचा फोन नंबर एडिट केला होता, ज्यामुळे महिलेला किंवा इतर कुणालाही साधी शंकासुद्धा आली नसती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मुंबईत जुहूमध्ये राहणाऱ्या, ६४ वर्षांच्या गीता शेनॉय नावाची महिला दुबईसाठी ऑनलाइन तिकिटे बुक करण्यासाठी स्कायस्कॅनर नावाच्या वेबसाइटवर गेली होती. तिकिटांबद्दल चौकशी करण्यासाठी वेबसाइटवर दिलेल्या क्रमांकावर महिलेने संपर्क केला. मात्र, वेबसाइटचा अधिकृत क्रमांक बदलून हॅकरने स्वतःचा नंबर एडिट केला असल्याने, हॅकर स्वतः महिलेशी स्कायस्कॅनर वेबसाइटचा प्रतिनिधी म्हणून बोलत होता. बोलताना त्याने महिलेला आपल्या फोनवर ‘एनीडेस्क’ [AnyDesk] नावाचे रिमोट-ॲप घेण्यास सांगितले.

हेही वाचा : केवायसी (KYC) अपडेट करायला गेले आणि सर्व कमाई गमावून बसले हे आजोबा; काय आहे प्रकरण जाणून घ्या…

त्या महिलेनेदेखील संपूर्ण प्रक्रियेवर विश्वास ठेऊन, हॅकरने सांगितलेले एनीडेस्क ॲप डाऊनलोड करून फोनवरील व्यक्तीला सर्व माहिती पुरवली. एनिडेस्क हे ॲप तुम्हाला कुठूनही फोन किंवा लॅपटॉपचा ताबा मिळवण्यास मदत करते. त्यामुळे महिलेच्या फोनवर आता संपूर्णपणे हॅकरचा ताबा होता. हॅकरने महिलेला बुकिंगसाठी सर्व मदत केली व फोनवर आलेला कोड शेअर करण्यास सांगितले, ज्यामुळे त्याला महिलेचा फोन अनधिकृतपणे वापरण्याची संधी मिळाली आणि त्याने अगदी सहज तिच्या बँक खात्यातील ४.४ लाख रुपये काढून घेतले.

महिलेला तिच्या खात्यातील एवढी मोठी रक्कम कमी झाल्याचे समजताच, क्षणाचाही विलंब न करता तिने जुहू पोलिस चौकीत जाऊन सर्व प्रकारची तक्रार नोंदवली. सर्व प्रकारची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनीदेखील ताबडतोब एफआयआर [FIR] लिहून घेतला. त्यासोबतच यांसारख्या इतर सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती देत, गुगलच्या नंबर बदलण्याच्या पर्यायावर नाराजी व्यक्त केली. या सर्व प्रकारानंतर मात्र वापरकर्त्यांकसाठी सिस्टीमच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उभा राहिला आहे.

अशा स्कॅम्सपासून सावध राहण्यासाठी काय करायला हवे?

१. खोटी माहिती

स्कॅम/फसवणूक करणारी व्यक्ती ई-मेल, फोन किंवा सोशल मीडियाद्वारे तुमच्याशी संपर्क करू शकते. ती व्यक्ती कुठल्यातरी मोठ्या, प्रसिद्ध कंपनीमधून तुमच्याशी बोलत असल्याचे सांगून तुम्हाला विश्वासात घेऊ शकतात. त्यामुळे आलेला फोन नंबर तपासून पाहावा. यासोबतच, जर ते तुम्हाला तुमच्या खाजगी माहितीबद्दल विचारत असतील, बँकेसंबंधी प्रश्न करत असतील तर सावध राहावे.

हेही वाचा : विवो X100 स्मार्टफोन सीरिज ‘या’ तारखेला होणार भारतात लॉन्च; काय आहेत याचे फिचर्स आणि किंमत जाणून घ्या…

२. माहिती तपासून पाहणे

तुम्हाला आलेला फोन नंबर किंवा ई-मेल हे एकदा तपासून पाहावे. समोरची व्यक्ती ज्या कंपनीचे नाव सांगत आहे, तशी कंपनी खरंच अस्तित्वात आहे की नाही हे इंटरनेटवर एकदा तपासून पाहा. एखादा ई-मेल, मेसेज याबद्दल तुमच्या मनात शंका असल्यास त्याबद्दल व्यवस्थित माहिती घेऊन मगच उत्तर द्यावे.

३. माहीत नसल्यास कोणतेही ॲप डाउनलोड करू नये

कोणतीही कंपनी तुम्हाला तुमच्या तक्रारींचे उत्तर देण्यासाठी एनीडेस्कसारखे रिमोट-ॲप डाउनलोड करण्यास सांगणार नाही. मात्र, तुम्हाला आलेल्या किंवा तुम्ही केलेल्या फोनवरील व्यक्ती असे ॲप डाऊनलोड करण्यास सांगत असल्यास सावध राहावे. कुणालाही तुमच्या फोनचा किंवा कॉम्प्युटरचा असा ॲक्सेस देऊ नये.

४. अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती देऊ नये

फोनवर आलेला ओटीपी, आपला कोणताही पासवर्ड, बँकेबद्दल माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सांगू नये.

५. त्वरित तक्रार करणे

आपल्यासोबत काहीतरी फसवणूक होत आहे, स्कॅम होत आहे, असे वाटत असल्यास सर्व घटनेबद्दल ताबडतोब अधिकृत तक्रार दाखल करावी.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online scam mumbai woman loses more than 4 lakh rupees while booking flight online dha