शॉर्ट व्हिडीओ फ्लॅटफॉर्म ‘टिकटॉक’ने एकेकाळी भारतात यूट्यूबलाही मागे टाकले होते. अनेक भारतीयांना रातोरात स्टार करण्यात टिकटॉकचा मोठा वाटा आहे. छोट्या व्हिडीओ शेअर करत अनेकांनी यातून पैसा, प्रसिद्धी कमावली. पण भारतीयांचा डेटा चोरी करत तो चीनला शेअर केल्याचा आरोपाखाली २०२० मध्ये भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली. भारतानंतर आता अनेक देशांनी चिनी शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ अॅप टिकटॉकवर बंदी घातली आहे.
या आठवड्यात अमेरिका आणि कॅनडा सरकारने मोबाईल डिव्हाइसवर आता टिकटॉक वापरावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. या दोन्ही देशांनी डेटा सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत हा निर्णय घेतला आहे.
टिकटॉकवर ‘या’ देशांनी घातली बंदी
असे अनेक देश आहेत ज्यांनी टिकटॉकवर अंशत: किंवा पूर्णता बंदी घातली आहे. गोपनीयता आणि सुरक्षेच्या कारणास्तव भारताने २०२० मध्ये टिकटॉक, मेसेजिंग अॅप WeChat सह डझनभर चीनी अॅप्सवर बंदी घातली. हिमालयातील डोकलाम सीमेवर भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत २० भारतीय सैनिक मारले तर अनेक सैनिक जखमी झाले. यानंतर भारताने चीनी कंपन्यांच्या अॅप्सवर सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली, ती बंदी आजवर कायम ठेवली आहे.
तैवान
डिसेंबर २०२० मध्ये एफबीआयने टिकटॉकमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करत असल्याचा इशारा दिल्यानंतर तैवानने टिकटॉकसह अनेक चीनी बंदी घातली. यानंतर तैवानमध्ये मोबाइल फोन, टॅब्लेट आणि डेस्कटॉप कॉम्प्युटरसह सरकारी उपकरणांमध्ये चिनी बनावटीचे सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी नसल्याचे जाहीर केले. यात टिकटॉक, डॉयिन, आणि जिओहोंगूश या अॅप्सचा समावेश आहे.
युनायटेड स्टेट्स
या आठवड्यात अमेरिकन सरकारने, आपल्या सरकारी एजन्सींना डेटा सुरक्षेच्या कारणास्तव फेडरल डिव्हाइसेस आणि सिस्टममधून टिकटॉक काढून टाकण्यासाठी ३० दिवसांचा अवधी दिला आहे. ही बंदी केवळ सरकारी उपकरणांसाठी लागू होते. पण काही यूएस खासदारांची पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी आहे.
कॅनडा
अमेरिकेच्या घोषणेनंतर आता कॅनडा सरकारने सोमवारी टिकटॉकच्या वापरावर देशात बंदी जाहीर केली. कॅनडा सरकारनेही गोपनियता आणि सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातल्याचे नमूद केले. यासोबत कर्मचाऱ्यांना भविष्यात हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यापासूनही रोखले जाणार आहे.
युरोपियन युनियन
युरोपियन संसद, युरोपियन कमिशन आणि युरोपियन युनियन कौन्सिल या युरोपियन युनियनच्या तीन प्रमुख संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना टिकटॉक वापर करण्यास बंदी घातली आहे. युरोपियन संसदेने मंगळवारी जाहीर केले की, ही बंदी 20 मार्चपासून लागू झाली आहे. त्यामुळे सर्व खासदार आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडील मोबाईल आणि इतर डिव्हाइसमधून हे अॅप काढून टाकण्याची शिफारस केली आहे.
पाकिस्तान
टिकटॉक हे अॅप अनैतिक सामग्रीला प्रोत्साहन देत असल्याची आरोपाखाली पाकिस्तानने ऑक्टोबर 2020 पासून किमान चार वेळा टिकटॉकवर तात्पुरती बंदी घातली आहे.
अफगाणिस्तान
अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने तरुणांची होणारी दिशाभूल रोखण्यासाठी २०२२ मध्ये टिकटॉक आणि चायनीज गेम अॅप पबजीवर बंदी घातली.
अनेक देशांच्या बंदीनंतर कंपनीने केले ‘हे’ विधान
चिनी कंपनी बाइटडान्स च्या मालकीच्या टिकटॉकने अनेकदा असे म्हटले की, चीनी सरकारसोबत ते कोणताही डेटा शेअर करत नाही आणि त्यांचा डेटा चीनमध्ये नाही. तसेच इतर सोशल मीडिया कंपन्यांपेक्षा हा अॅप अधिक वापरकर्त्यांचा डेटा संकलित करत असल्याच्या सर्व आरोपांचे कंपनीने खंडन केले.