वाढत्या तापमानामुळे मोबाइल जास्त गरम झाला, एसीला आग लागली, अशा अनेक घटना समोर येत आहेत. उत्तर भारतातील बहुतांश भागांत ५० अंशांपेक्षा जास्त तापमान आहे. उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असल्याने केवळ मानवांनाच त्रास होत नाही, तर आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांनाही धोका निर्माण होऊ शकतो. अति उष्णतेमुळे स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही आणि अगदी एअर कंडिशनर जास्त गरम होऊ शकतात आणि समस्या जास्त वाढली तर त्यांना आगही लागू शकते.
पण, उपकरणे गरम का होतात आणि आग कशामुळे लागते? यावर काय उपाय केले पाहिजेत? याबद्दल या लेखातून अधिक जाणून घेऊयात.
गॅजेट्स किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे जास्त गरम का होतात?
स्मार्टफोन, लॅपटॉप आणि एसी यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर काम सुरू असताना ते उष्णता निर्माण करतात. जेव्हा सभोवतालचं तापमान जास्त असतं, तेव्हा पंख्यांसारख्या उपकरणांमधील कूलिंग यंत्रणा उष्णता प्रभावीपणे कमी करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे ते खूप गरम होतात. या प्रक्रियेत आतले काही पार्ट्स खराब होऊ शकतात आणि आगदेखील लागू शकते. हेच कारण आहे की, एअरलाइन्स तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि पॉवर बँक इतर सामानाबरोबर ठेवण्यास नकार देते. कारण अति उष्णतेच्या बाबतीत, हवेच्या उच्च तापमानामुळे बॅटरी आणि गॅझेटमधील घटक गरम होऊन आग लागू शकते.
त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप दुपारच्या सुमारास घरामध्ये वापरत असाल, तर ते चालू नसतानाही गरम झाल्याचे तुमच्या लक्षात येईल. हे त्यांच्या आत असलेल्या बॅटरीमुळे आहे. उपकरणे जास्त गरम होण्याची काही कारणे पुढीलप्राणे –
१. मोकळी हवा न मिळणे – लॅपटॉप आणि टीव्हीमधून उष्णता बाहेर जाण्यासाठी उपकरणांनवर छिद्रे (व्हेंट्स) डिझाइन केलेले असतात. उपकरणांना अडचणीच्या जागेत ठेवल्यामुळे व्हेंट्सवाटे मोकळी हवा बाहेर जाण्यास मार्ग मिळत नाही.
२. सतत वापर करणे – ब्रेक न घेता जास्त काळ उपकरणे वापरल्याने त्यांचे तापमान वाढते. हे विशेषतः गेमिंग किंवा व्हिडीओ एडिटिंगसारख्या कामांदरम्यान जास्त जाणवते.
३. वातावरण – बाहेरील अति उष्णतेमुळे उपकरणं थंड राहणे कठीण होते. जेव्हा स्मार्टफोन, लॅपटॉप, एसी थेट सूर्यप्रकाशात असेल तर त्याचे तापमान आणखी वाढते.
४. धूळ – खराब झालेले पंखे, खराब झालेले थर्मल पेस्ट, स्मार्टफोन, एसी, लॅपटॉप आणि इतर उपकरणांवर धूळ जमा झाल्यामुळे त्यांच्या कूलिंग सिस्टमवरही परिणाम होऊ शकतो.
ओव्हर हिट झालेले डिव्हाइसेस कसे थंड करावे?
जर तुम्हाला डिव्हाइस जास्त गरम होण्यापासून रोखायचे असेल किंवा आग टाळायची असेल तर तुम्ही पुढील काही टिप्सचा नक्की वापर करून पाहा.
१. जर तुम्हाला वाटत असेल की, डिव्हाइस जास्त गरम होत आहे तर थोडा वेळ त्यालाही विश्रांती द्या. डिव्हाइस बंद करा आणि पॉवर अनप्लग करा. यामुळे पुढील उष्णता निर्मिती थांबते आणि आतील पार्टस थंड होऊ शकतात.
२. अनावश्यक ॲप्स बंद करा आणि स्क्रीनची ब्राईटनेस कमी करा. स्मार्टफोन फ्लाईट मोडवर टाका, यामुळे डिव्हाइसेस थंड होऊ शकतात.
३. तुमचे डिव्हाइस सूर्यप्रकाशापासून दूर सावलीत ठेवा. मोबाइलचे कव्हर काढल्यामुळेदेखील मोबाइलचे तापमान थंड होऊ शकते.
४. लॅपटॉपसाठी अंतर्गत पंखा असलेल्या कूलिंग पॅडचा तुम्ही वापर करू शकता.
तुमच्या डिव्हाइसला आग लागल्यास काय करावे?
१. वेळेचं व परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन जर शक्य असेल तरच डिव्हाइस अनप्लग करा. मोठ्या उपकरणांसाठी मुख्य वीजपुरवठा बंद करा.
२. आग लहान आणि आटोक्यात आणण्याजोगी असल्यास, विद्युतीय आगीसाठी रेट केलेले अग्निशामक यंत्र वापरा. पाणी वापरू नका, कारण ते वीज प्रवाहित करू शकते आणि आणखी नुकसान करू शकते.
३. आग पसरली किंवा तुम्ही ती आटोक्यात आणू शकत नसाल तर परिसर रिकामे करा आणि ताबडतोब आपत्कालीन सेवांना कॉल करा.