Phone Care Tips: भारतामध्ये कडक उन्हाळा असतो. या तीन-चार महिन्यांच्या कालावधीमध्ये वातावरण खूप गरम असते. कडक उन्हाचा प्रभाव आपल्या शरीरावर होत असतो. तसं पाहायला गेलं, तर उन्हाळ्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर उष्णतेचा परिणाम होत असतो. उन्हाळ्यात विद्युत उपकरणे तापतात. आपल्या दैनंदिन वापरातील मोबाईल फोनदेखील गरम वातावरणामुळे तापू शकतो. कधी-कधी स्मार्टफोन जास्त तापल्यावर तो फुटण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात फोन गरम होण्यामागे बऱ्याच गोष्टी कारणीभूत असू शकतात. फोन तापून फुटू नये यासाठी काही ट्रिक्सची मदत घेता येते.
फोन केस वापरा.
स्मार्टफोनची बॅटरी खूप नाजूक असते. उष्णतेमुळे फोन तापल्यावर बॅटरी देखील गरम होऊ शकते. अशा वेळी स्मार्टफोन फोन केस (Phone case) मध्ये ठेवणे योग्य मानले जाते. यामुळे फोन आणि त्यातील बॅटरी दोन्ही तापत नाही.
उन्हामध्ये ठेवू नका.
स्मार्टफोनसाठी 32-95 डिग्री फॅरेनहाइट तापमान योग्य मानले जाते. कडक उन्हामध्ये ठेवल्याने त्याचे तापमान वाढून विस्फोट होऊ शकतो. शक्य तितक्या थंड वातावरणामध्ये फोन ठेवावा.
चार्जिंग करताना फोन झाकू नका.
अंथरुणासारख्या जागी चार्जला लावल्याने आसपासच्या गरम वातावरणामुळे फोन तापू शकतो. फोन चार्ज करताना तो सपाट पृष्ठभागावर ठेवावा, जेणेकरुन त्याचे तापमान नियंत्रणात राहील. तसेच चार्जिंग होत असताना फोन वापरणे टाळा.
बॅटरी हायजिनकडे लक्ष द्या.
स्मार्टफोनसंबंधित बॅटरी हायजिन हा प्रकार फार महत्त्वपूर्ण असतो. यानुसार 30-80% टक्के बॅटरी असताना फोन चार्जला लावावा. 100% होण्याआधीच चार्जिंग बंद करावे. तसेच अनावश्यक गोष्टी डिलीट कराव्यात. असे केल्याने बॅटरीवरील ताण कमी होतो.
योग्य चार्जरचा वापर करा.
फोन खरेदी करताना त्याच्यासह चार्जर देखील दिला जातो. फोननुसार योग्य क्षमता असलेला चार्जर निर्माता कंपनी ग्राहकांना देत असतो. त्यामुळे कंपनीने दिलेल्या चार्जरचा वापर करावा. एकच चार्जर वापरणे नेहमी फायदेशीर असते. सतत चार्जर बदलल्याने स्मार्टफोनची बॅटरी खराब होऊ शकतो. यामुळे फोन तापू देखील शकतो.
गरजेपेक्षा जास्त डेटा स्टोअर करु नका.
प्रत्येक स्मार्टफोनमध्ये ठराविक प्रमाणात स्टोरेज असते. त्याच्याच गरजेपेक्षा जास्त डेटा भरल्याने फोनवर ताण येऊ शकतो. त्यात उन्हामुळे फोन तापू शकतो. या दोन्ही गोष्टीमुळे मोबाइलवर ताण आल्याने तो फुटू शकतो.