११ मे हा प्रत्येक भारतीयासाठी खास आहे. १९९८ पासून ११ मे रोजी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताने केलेले प्रगती आणि त्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बहुमूल्य योगदानाचे स्मरण राहावे या उद्देशाने हा दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नॅशनल टेक्नॉलॉजी डे’ च्या निमित्ताने विद्यान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित ५,८०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी केली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळी पोस्टाचे तिकीट आणि नाण्याचंही प्रकाशन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नॅशनल टेक्नॉलॉजी डे’ च्या निमित्ताने दिल्लीमधील प्रगती मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या एक कार्यकमाचे उद्घाटन केले. त्याशिवाय ५,८०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ केला. बुधवारी पंतप्रधान कार्यालयाने (pmo) ने जारी केलेल्या निवेदनानुसार, हा कार्यक्रम राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या २५ व्या वर्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात असणार आहे. हा कार्यक्रम ११ ते १४ मे या कालावधीमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह उपस्थित होते.
देशातील वैज्ञानिक संस्था मजबूत करणे हे पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेशी जोडलेले आहे. आज ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली त्यामध्ये इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व्हेटरी-इंडिया (LIGO-India), होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबईच्या प्लॅटिनम ज्युबिली ब्लॉकचा समावेश आहे.
१९७४ मध्ये भारताने पोखरणमध्ये पहिल्यांदा अणु चाचणी केली होती. या मोहिमेला Smiling Buddha असे नाव देण्यात आले होते. आपल्या देशाला अण्वस्त्र संबंधितचे तंत्रज्ञान सिद्ध करण्यासाठी काही विशिष्ट चाचण्या करण्याची गरज होती. परंतु त्यावेळी आंतरराष्ट्रीय दबावामुळे आणि राजकीय कारणांमुळे अणु चाचण्या करण्यामध्ये अडचणी येत होत्या. पुढे १९९८ मध्ये पाच यशस्वी अणु चाचण्या करुन भारताने जगाला आपली खरी ताकद दाखवून दिली. लगेच दोन दिवसांनी दोन नवीन अण्वस्त्रांची चाचणीदेखील करण्यात आली. या संपूर्ण प्रकल्पाचे नेतृत्त्व देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम करत होते.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी बुधवारी सांगितले, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ मे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या दिवशी दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्सपो २०२३ चे उदघाटन करणार आहेत. प्रगती मैदानावरील असलेल्या सभागृह क्रमांक २ आणि तीनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये देशभरातील संग्रहालयांच्या सांस्कृतिक वारशाची माहिती घेण्याची संधीही प्रेक्षकांना मिळणार आहे.