NASA’s Lunar Railway System: रेल्वे, लोकल ट्रेन हे भारतीयांच्या जिव्हाळ्याचे विषय. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अनेक ठिकाणी रेल्वेचे विस्तृत जाळे पसरले आहे. आणि आता पृथ्वीच्या कक्षा मोडून रेल्वे थेट चंद्रापर्यंत घेऊन जाण्याची तयारी सुरु झाली आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी नासा चंद्रावर कार्यक्षम पेलोड वाहतुकीसाठी पहिली लुनार रेल्वे प्रणाली विकसित करण्याची योजना आखत आहे. NASA ने एक अधिकृत ब्लॉग पोस्ट शेअर करत यामध्ये दीर्घकाळ चालणाऱ्या या रोबोटिक वाहतूक प्रणालीचा उल्लेख केला आहे. २०३० च्या दशकापर्यंत ही प्रणाली विकसित होईल असा अंदाज नासाने वर्तवला आहे. नासाच्या आगामी चंद्र ते मंगळ मोहिमांमध्ये आणि रोबोटिक लूनर सरफेस ऑपरेशन्स 2 (RLSO2) सारख्या मिशनसाठी ही लुनार रेल्वे प्रणाली महत्त्वाची असणार आहे.
चंद्राच्या तळाभोवती, लँडिंग झोन किंवा इतर मुख्य केंद्रबिंदूंवरून आवश्यक ते सामान मूळ मोहिमेच्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी एक वाहतूक व्यवस्था आवश्यक होती ज्यासाठी आता नासाने FLOAT म्हणजेच (Flexible Levitation on a Track) ही प्रणाली सादर केली आहे. नेमकं या माध्यमातून कोणत्या प्रश्नांवर नासा उत्तर शोधू शकणार आहे व त्याचा फायदा काय हे जाणून घेऊया..
FLOAT प्रणाली म्हणजे काय?
FLOAT सिस्टीम अनपॉवरेड मॅग्नेटिक रोबोट्सचा वापर करून तीन लेअर्सची लवचिक फिल्म ट्रॅकवर उत्सर्जित करेल, या ग्रेफाइट लेअरमुळे रोबोट्सना डायमॅग्नेटिक लेव्हिटेशनच्या मदतीने ट्रॅकवर फ्लोट होण्यास मदत होईल. फ्लेक्स-सर्किट लेयर रोबोट्सला ट्रॅकच्या बाजूने नियंत्रितपणे पुढे नेण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक थ्रस्ट निर्माण करेल आणि एक पर्यायी पातळ-फिल्म सोलर पॅनेल लेअर बेससाठी सूर्यप्रकाशात असताना उर्जा निर्माण करेल. फ्लोट रोबोट्समध्ये हालचालींसाठी चाके नसतात ज्यामुळे ट्रॅकवर पुढे मागे जाताना चंद्राच्या पृष्ठभागावर घासले जाऊन झीज होण्याची शक्यता कमी असते.
अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, नासा या फ्लोट सिस्टीमच्या मदतीने व चंद्राच्या पृष्ठभागावर एक घसरती लेअर तयार करणार आहे ज्यामुळे रोबोट्सना त्यावरून एखाद्या घसरगुंडीप्रमाणे घसरून पुढे जाता येईल. यासाठी सौरऊर्जेचा वापर पर्याय म्हणून करण्यात येईल. यामुळे ज्यापद्धतीने आपण एखादी वस्तू पुढे ढकलून एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवतो त्यापद्धतीने आवश्यक बांधकाम साहित्य, मोहिमांसाठी आवश्यक वस्तूंची ने-आण करण्यासाठी ही प्रणाली काम करणार आहे.
नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचे चे रोबोटिक्स तज्ज्ञ एथन स्केलर यांनी या प्रणालीविषयी माहिती देताना सांगितले की, “आम्हाला पहिली लुनार रेल्वे प्रणाली तयार करायची आहे, जी चंद्रावर विश्वासार्ह, स्वायत्त आणि कार्यक्षम पेलोड वाहतूक प्रदान करेल. “
नासाच्या सुरुवातीच्या योजनेनुसार , FLOAT फक्त मशीनसाठी असेल. चंद्राच्या पृष्ठभागावरील धुळीपासून रोबोट्सची होणारी झीज कमी करण्यासाठी तीन-लेयर मूव्ही ट्रॅकवर फिरणारे चुंबकीय रोबोट तयार केले जातील. या रोबोट्सवर गाड्या बसवल्या जातील ज्या ताशी १.६१ किलोमीटर वेगाने फिरतील. यातुन नासाच्या तळावर दररोज १०० टन सामग्रीची ने- आण शक्य होईल. चंद्रावरील बदलणाऱ्या स्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता या लुनार रेल्वे प्रणालीत असेल.
हे ही वाचा<< चुकून मेसेज डिलीट फॉर मी झाला? आता चिंता मिटणार; व्हॉट्सॲपने आणलेलं ‘हे’ नवीन फीचर कसं वापरायचं बघा
तर, NASA ने असेही नमूद केले की फेज 2 मध्ये, आम्ही चंद्रावरील मानवी शोध (HEO) कार्याला समर्थन देणारे मीटर-स्केल रोबोट/किमी-स्केल ट्रॅकचे उत्पादन करणार आहोत. या कामाचे नियंत्रण, उपाययोजना, दीर्घकालीन देखरेखीशी संबंधित जोखीम दूर करण्याकडे फेज दोन मध्ये लक्ष दिले जाईल.