Realme 10 4g launch : स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रातील नामांकीत कंपनी रिअलमीने आपला नवा स्मार्टफोन Realme 10 4g लाँच केला आहे. हा फोन पातळ आणि हल्का असून फोनमध्ये अडथळ्याशिवाय काम करण्यासाठी मीडियाटेक हेलिओ जी ९९ प्रोसेसर देण्यात आले आहे. पण देशात ५ जी सेवा सुरू झाली आहे. कंपन्या आता ५ जी फोन बाजारात उपलब्ध करत असून, त्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. असे असताना बाजारात हा फोन विक्रीच्या बाबतीत तग धरून उभा राहू शकेल का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान या फोनमध्ये काय फीचर्स मिळत आहेत आणि त्याची किंमत काय आहे, याबाबत जाणून घेऊया.
फीचर्स
रिअलमी १० ४जी स्मार्टफोनमध्ये माली – जी ५७ एमसी २ जीपीयूसह ६ एनएम मीडियाटेक हेलिओ जी ९९ एसओसी प्रोसेसर देण्यात आले आहे. स्क्रिन बाबत बोलायचे झाले तर, स्पष्ट चित्र दिसण्यासाठी फोनमध्ये १०८०x२४०० एफएचडी + रेझोल्युशन असलेला ६.४ इंचचा अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या पॅनलला गोरिला ग्लास ५ ची सुरक्षा मिळत आहे.
(आता INSTAGRAM POST शेड्यूल करता येणार, जाणून घ्या माहिती)
छायाचित्रण
छायाचित्रणासाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरासह २ एमपीचा डेप्थ सेन्सर मिळत आहे. तर सेल्फी काढण्यासाठी फोनमध्ये १६ एमपीचा सेन्सर देण्यात आला आहे. दीर्घकाळ काम करण्यासाठी फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी ३३ वॉट चार्जिंगसाठी सक्षम आहे. फोन २८ मिनिटांमध्ये ५० टक्के चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे.
किंमत
हा फोन इंडोनेशियामध्ये १० नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. भारतात कधी लाँच होईल याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. स्मार्टफोन ४ व्हेरिएंटमध्ये मिळेल. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी रोम व्हेरिएंटची किंमत जवळपास १८ हजार ६०० रुपये आहे. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी रोम व्हेरिएंटची किंमत जवळपास २० हजार ४०० रुपये आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी रोम व्हेरिएंटची किंमत जवळपास २१ हजार ८०० रुपये आहे आणि ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी रोम व्हेरिएंटची किंमत जवळपास २४ हजार ३०० रुपये आहे. हा स्मार्टफोन क्लॅश व्हाइट आणि रश ब्लॅक या दोन रंग पर्यायांमध्ये मिळेल.