Reliance jio 5g service in pune : देशात हळूहळू का होईना पण ५ जी सेवा विस्तारत आहे. सध्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन दूरसंचार कंपन्या ५ जी सेवा पुरवत आहेत. आगामी काळात इतर काही कंपन्या देखील ही सेवा पुरवतील. ५ जी सेवा पुरवण्यात रिलायन्स आघाडीवर आहे. दिल्ली मध्ये ट्रु ५ जी सेवा सुरू केल्यानंतर आता कंपनीने पुण्यामध्ये ५ जी सेवा सुरू केली आहे. पुणेकरांना आता त्यांच्या ५ जी फोन्सवर वेगवान इंटरेनेटचा आनंद घेता येणार आहे.
काल २३ नोव्हेंबरपासून जिओ ५ जी सेवा पुण्यात सुरू झाली. पुणेकरांना १ जीबीपीएसपेक्षा अधिक स्पीडसह अमर्यादित ५ जी डेटा वापरता येणार आहे. जिओ युजर्सना जिओ वेल्कम ऑफरसाठी आमंत्रण पाठवण्यात येईल. हे आमंत्रण सर्वांना मिळणार नाही. ज्यांच्याकडे प्रिपेड किंवा पोस्टपेडमध्ये २३९ रुपये किंवा त्यावरील अॅक्टिव्ह प्लान सुरू आहे, अशा युजर्सनाच जिओ आमंत्रण पाठवणार आहे.
विशेष म्हणजे, विद्यमान जिओ युजर्सना ५ जी सेवा वापरण्यासाठी नवीन सीम खरेदी करावे लागणार नाही, कारण जिओ ४ जी सीम ५ जी सेवा सपोर्ट करणार आहे. त्यामुळे युजरला केवळ सीममध्ये २३९ रुपयांचा अॅक्टिव्ह प्लान सुरू आहे की नाही, याची खात्री करावी लागणार आहे. सेवेसाठी पात्र युजर्सना माय जिओ अॅपकडून आमंत्रण पाठवले जाईल. यासाठी तुम्ही माय जिओ अॅप तपासू शकता.
प्रिपेड प्लान्सबाबत बोलायचे झाल्यास, जिओने अद्याप ५ जी सेवेसाठी विशिष्ट प्लान्स लाँच केलेले नाहीत. आगामी काळात अधिक शहरांमध्ये ५ जी सेवा सुरू झाल्यानंतर जीओ प्लान्स लाँच करणार आहे. २०२३ पर्यंत संपूर्ण भारतात जिओ सेवा पुरवण्याचा कंपनीचा मानस आहे.