रिलायन्स जिओने भारतात आपला एक नवीन मोबाइल फोन लॉन्च केला आहे. रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी Jio Bharat B1 4G फोन लॉन्च केला आहे. हा फोन जिओभारत या सिरीजअंतर्गत लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन ४जी फिचर असलेला फोन आहे. आधीपासून बाजारात उपलब्ध असलेल्या जिओ K2 Karbonn आणि जिओ V2सिरीज पेक्षा हा फोन अधिक प्रगत (अॅडव्हान्स) आहे. तथापि, हे मॉडेल वेबसाइटवर वेगळ्या सिरीजमधील मॉडेल म्हणून दाखवण्यात आले आहे. कदाचित या सिरीजमध्ये या मॉडेलशीवाय आणखी काही मॉडेल लॉन्च केले जाऊ शकतात.
जिओ भारत B1 4G: स्पेसिफिकेशन्स
जिओ भारत बी १ या फोनमध्ये २.४ इंचाचा QVGA आयताकार डिस्प्ले मिळतो. हा फिचर फोन Threadx RTOS वर चालतो आणि ०.०५ जीबी रॅमसह येतो. फोनमध्ये नॅनो सिमचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी वापरकर्त्यांना ब्लूटूथ, वायफाय आणि यूएसबी यासारखे फीचर्स मिळणार आहेत. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.
हेही वाचा : Apple चा फेस्टिवल सिझन सेल ‘या’ तारखेपासून सुरू होणार; काय आहेत ऑफर्स? जाणून घ्या
जिओच्या या फोनमध्ये ४ जी नेटवर्कचा सपोर्ट मिळणार आहे. तसेच यामध्ये मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून १२८ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येते. यामध्ये वापरकर्त्यांना २००० mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. एकदा चार्ज केल्यास हा फोन ३४३ तास इतकी स्टॅण्डबाय बॅटरी लाइफ ऑफर करतो असे कंपनीचे म्हणणे आहे. जिओचा नवीन फोनमध्ये २३ भारतीय भाषांचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये मनोरंजनासाठी जिओसिनेमा, जिओसावन आधीपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिओ भारत B1फोनमध्ये इनबिल्ट जिओ पे ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वापरकर्त्यांना जिओ पे च्या माध्यमातून युपीआय पेमेंट करता येणार आहे.
जिओ भारत B1 4G: किंमत
जिओ भारत B1 ४ जी हा फोन खरेदीदार काळ्या रंगामध्ये खरेदी करू शकणार आहेत. या फोनची किंमत केवळ १,२९९ रुपये इतकी आहे. हा फोन जिओची अधिकृत वेबसाइट आणि अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.