रिलायन्स जिओने आता नेटफ्लिक आणि प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणेच जिओसिनेमा ॲपसाठी प्रिमियम सबस्क्रिप्शन प्लॅन आणला आहे. विशेष ऑफरनुसार आता प्रतिमहिना २९ रुपयांना हा प्लॅन मिळत आहे. प्रचाराचा काळ संपल्यानंतर याच प्लॅनसाठी युजर्सना प्रति महिना ५९ रुपये खर्च करावे लागणार आहेत. सध्या आयपीएलचे सामने पाहण्यासाठी अनेक लोकांनी जिओ सिनेमा ॲप घेतलेले आहे. त्यामुळे त्यांना थेट यापुढे आयपीएलचे सामने मोफत पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिओसिनेमाच्या नव्या प्रिमियम प्लॅन्समध्ये जाहिरातीचा भडिमार वगळण्यात येणार आहे. पैसे देऊन कटेंट पाहणाऱ्यांना ही सुखद बाब असेल. तसेच ४के क्वालिटीचे व्हिडिओ पाहण्याचाही आनंद घेता येणार आहे. या सबस्क्रिप्शनमध्ये एक्सक्लुजिव्ह सीरीज, चित्रपट, हॉलिवूडचे सिनेमे, मुलांसाठी असलेला कटेंट पाहता येणार आहे. तसेच मोबाइल आणि टीव्हीवरही जिओसिनेमा पाहता येणे शक्य होणार आहे.

जिओसिनेमाकडून कौटुंबिक प्लॅनचीही घोषणा करण्यात आली आहे. प्रतिमहिना ८९ रुपये खर्च करून हा ‘फॅमिली प्लॅन’ घेता येणार आहे. प्रचाराचा काळ संपल्यानंतर या प्लॅनची किंमत प्रतिमहिना १५९ रुपये इतकी केली जाणार आहे. या प्लॅनचा फायदा असा की, एकाच वेळी चार डिव्हाईसवर जिओसिनेमा ओटीटीचा आनंद घेता येणार आहे.

मोफत आणि प्रिमियम यात फरक काय?

सध्या आयपीएलचा हंगाम सुरू असून कोट्यवधी लोक जिओसिनेमावर मोफत आयपीएल पाहत असतात. जिओने घोषणा केल्यानुसार यापुढेही क्रीडा प्रकारातील सर्व कटेंट मोफत पाहता येणार आहे. त्यामध्ये आयपीएलचाही समावेश आहे. तर जिओसिनेमा प्रिमियम सदस्यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि मालिकांचा आनंद लुटता येणार आहे.

आयपीएल सध्यातरी मोफत

जिओसिनेमाच्या निवेदनानुसार आयपीएल सध्यातरी मोफत पाहता येणार आहे. तसेच इतर भारतीय सिनेमे आणि मालिका सध्या मोफत पाहता येणार आहेत. ज्यामध्ये जाहिरातीही दिसतील. वायोकॉम १८ डिजिटलचे सीईओ किरण मनी म्हणाले, “आम्ही संपूर्ण भारतासाठी एक करमणुकीचे साधन म्हणून या उत्पादनाकडे पाहत आहोत. त्यामुळे व्यवसायापेक्षाही आमचे ध्येय भारताला आणि भारतातील जिओसिनेमाच्या वापरकर्त्यांना करमणुकीचा एक वेगळा आनंद देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio takes on netflix and amazon prime with premium plan will ipl free to watch kvg