युक्रेनवरील आक्रमक भूमिकेनंतर अनेक देशांनी रशियाची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक देश आणि आंतराष्ट्रीय संघटनांनी रशियावर बंधनं लादली आहेत. ऑटो आणि क्रीडा क्षेत्रानंतकर आयफोन कंपनीने रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. अॅपलने रशियातील सर्व प्रोडक्टच्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर रशियाच्या RT आणि स्पुटनिक अॅप हे अॅपल स्टोरमधून काढून टाकलं आहे. यापूर्वी कंपनीने अॅपल पे सर्व्हिस बंद केली होती.
युक्रेनचे उपपंतप्रधान आणि युक्रेनचे डिजिटल परिवर्तन मंत्री मायखाइलो फेडोरोव्ह यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना एक खुले पत्र लिहिले होते. फेडोरोव्हने हे पत्रही @FedorovMykhailo या त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते. पत्रात कुक यांच्याकडे रशियामध्ये आयफोनची विक्री थांबवण्याची विनंती केली होती. यामुळे अमेरिकेकडून रशियावर घातलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईल बळ मिळेल, असं सांगण्यात आलं होतं. या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत अॅपलने हा निर्णय घेतला आहे. अॅपलने म्हटले आहे की, ‘रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे आम्ही चिंतित आहोत. हिंसाचारग्रस्त असलेल्या सर्वांच्या पाठीशी उभे आहोत. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही अनेक पावले उचलली आहेत. गेल्या आठवड्यात आम्ही रशियातील सर्व सेल चॅनेलची निर्यात थांबवली. अॅपल पे आणि इतर सेवांवर बंधनं घातली आहेत.’ अॅपलच्या निर्णयानंतर मायखाइलो फेडोरोव्ह यांनी ट्विट करून रशियामध्ये अॅपलच्या उत्पादनांची विक्री थांबवण्याची माहिती दिली. अॅप स्टोअरवर एक्सेस बंद करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
अॅपल ही रशियाला स्मार्टफोन पुरवठा करणारी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी आहे. स्टॅटकाउंटरच्या अहवालानुसार, रशियामध्ये अॅपल आयफोनचा बाजार हिस्सा २८.७२ टक्के आहे. त्यानंतर २३.३ टक्क्यांसह Xiaomi चा क्रमांक लागतो. तर सॅमसंग २२.४ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मग Huawei आणि Realme चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.