रशियाच्या चांद्रयान मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. रशियाचे लुना-२५ हे यान चंद्रावर कोसळलं आहे. लुना-२५ हे यान २१ ऑगस्टला चंद्रावर अलगदपणे उतरण्याचा प्रयत्न करणार होतं. पण, त्यापूर्वीच हे यान कोसळलं आहे. रशियन अंतराळ संशोधन संस्था रोस्कोसमॉसने ही माहिती दिली आहे.
जगात चंद्राबाबत दोन मोहिमा सुरु होत्या. त्यात इस्रोची चांद्रयान-३ आणि रशियाची लुना-२५ यांचा समावेश होता. इस्रोच्या यानाने १४ जुलैला चंद्राकडे कूच केलं होतं. यानंतर २६ दिवसांनी म्हणजेच १० ऑगस्टला रशियाच्या लुना-२५ यानाचं प्रक्षेपण झालं होतं. चांद्रयान-३ २३ ऑगस्टला, तर दोन दिवस आधी २१ ऑगस्टला लुना-२५ हे यान चंद्रावर उतरणार होते.
२० ऑगस्टला रात्री लुना-२५ हे यान कक्षा कमी करत चंद्राच्या आणखी जवळ जाणार होते. यासाठी यानावरील इंजिन सुरु करत दिशा बदल करण्याचा प्रयत्न केला जाणार होता. मात्र, इंजिनाचे प्रज्वलन झालं नसल्याची माहिती रशियाने जाहीर केली होती. यातच आता लुना-२५ हे यान चंद्रावर कोसळल्याची माहिती रशियन अंतराळ संस्थेने दिली आहे.
हेही वाचा : Chandrayaan-3 : ISROच्या मोहिमेचा चंद्रावरील helium 3 शी संबंध काय? हे खनिज का महत्वाचे?
पाच दशकानंतर चांद्रयान मोहिम
दरम्यान, पन्नास वर्षानंतर रशिया चंद्रावर संशोधन करत आहे. रशियाने १० ऑगस्ट १९७६ साली लुना-२५ हे यान पाठवलं होतं. पाच दशकाच्या कालावधीनंतर प्रथमच लुना-२५ हे यान पाठवण्यात आलं आहे. पण, रशियाच्या चांद्रयान मोहिमेला अपयश आल्याचं दिसत आहे.