Samsung galaxy s22 hacked : चांगला कॅमेरा, बिल्ड क्वॉलिटी आणि बजेट फोन म्हणून सॅमसंगचे फोन ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. मात्र, ग्राहकांना आता सावध होणे आवश्यक आहे. कारण, एका अहवालानुसार सॅमसंग कंपनीचा एक फोन काही सेकंदातच हॅक झाला आहे. अलीकडे डेटा चोरीचे अनेक प्रकार अहवालांतून समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर सॅमसंग युजर्सनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अहवालात काय सांगण्यात आले? जाणून घेऊया.
ब्लिपिंक कम्प्युटरच्या अहवालानुसार, पेनटेस्ट लिमिटेड येथील संशोधकांच्या एका संघाने झिरो डे बग प्लांट करून सॅमसंगवर हल्ला केला. त्यांना हा फोन ५५ सेकंदात हॅक करता आला. यासाठी त्यांना Pwn2Own हॅकिंग कॉन्टेस्टमध्ये २५ हजार डॉलर्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे, या इव्हेंटमध्ये Samsung Galaxy S22 हा फोन ४ वेळा हॅक झाला होता.
इव्हेंट ६ ते ८ डिसेंबर पर्यंत चालला. ब्लिपिंग कम्प्युटरच्या अहवालानुसार, Pwn2Own हॅकिंग कॉन्टेस्टमध्ये १४ देशांतील २६ स्पर्धकांनी भाग घेतला होता. इव्हेंटच्या पहिल्या दिवशी, स्टार लॅब संघ आणि फक्त चिम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरक्षा संशोधकाने गॅलक्सी एस २२ वर दोन सायबर हल्ले चढवले. सर्व चार प्रकरणांमध्ये हा स्मार्टफोन सर्व उपलब्ध अपडेट्सह नवीन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालत होता.
हॅकिंग स्पर्धेदरम्यान, सुरक्षा संशोधक आणि संघांनी अनेक श्रेणींमधील उपकरणांवर हल्ले केले. यात स्मार्टफोन, होम ऑटोमेशन हब, प्रिंटर्स, वायरलेस राऊटर्स, नेटवर्क अटॅच स्टोअरेज आणि स्मार्ट स्पीकर कॅटेगरी यांचा समावेश आहे. हे सर्व अपडेटेड आणि डिफॉल्ट कॉन्फिगरेशनमध्ये होते. विशेष म्हणजे, अहवालानुसार, अॅपल आयफोन १३ आणि गुगल पिक्सेल ६ स्मार्टफोन हॅक करण्यासाठी कोणत्याही गटाने साइन अप केले नाही.